मुंबई,दि.६: Udhayanidhi Stalin: राष्ट्रपतींचा उल्लेख करत उदयनिधी स्टॅलिन यांचे सनातन धर्माबद्दल वक्तव्य केले आहे. सनातन धर्म समता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे आणि त्याचे निर्मूलन केले पाहिजे, असे मत द्रमुकच्या युथ विंगचे सचिव आणि तामिळनाडूचे युवा कल्याणमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी व्यक्त केले. सनातन धर्माची तुलना त्यांनी कोरोना व्हायरस, मलेरिया आणि डेंग्यूशी केली. अशा गोष्टींना विरोध करू नका, तर नष्ट करा, असे आवाहनही त्यांनी केले. उदयनिधी यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. तीव्र टीकेनंतर उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी नवीन संसद भवनाचा संदर्भ घेऊन मोठे विधान केले आहे. यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनिधी यांच्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात देशातील २६२ नामवंतांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या विधानावरून गदारोळ सुरू असताना, उदयनिधी मात्र वक्तव्यावर ठाम आहेत. इतकेच नाही तर आता पुन्हा एकदा नवे विधान केले आहे.
Udhayanidhi Stalin: राष्ट्रपतींचा उल्लेख करत उदयनिधी स्टॅलिन यांचे सनातन धर्माबद्दल वक्तव्य
मी माझ्या शब्दावर ठाम आहे. सनातन धर्मात भेदभाव होत असेल तर मी त्याविरोधात बोलणार, असे उदयनिधी यांनी स्पष्ट केले. यानंतर सनातन धर्मातील भेदभावाबाबत प्रश्न विचारला असता, देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. जातीच्या आधारावर होत असलेल्या भेदभावाचे हे ताजे उदाहरण आहे. माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित नव्हत्या, हेच सनातन धर्माचे उत्तम उदाहरण आहे, असे उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सनातन हे नाव संस्कृतमधून आहे. सनातनचा अर्थ काय? तो शाश्वत आहे. म्हणजे तो बदलता येत नाही. कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. ते म्हणाले की, सनातनने जातीच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडली. ते म्हणाले की, सनातनने स्त्रियांसाठी काय केले? त्यांनी पती गमावलेल्या स्त्रियांना आगीत ढकलले (पूर्वीची सती प्रथा). त्या काळात बालविवाहही झाले; पण द्रमुक सरकारने महिलांना बसमध्ये मोफत प्रवास दिला. विद्यार्थिनींना त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी १००० रुपये महिन्याला मदत दिली, असे उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटले आहे.