मुंबई,दि.६: Nitin Gadkari On Politics: भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या विधानांमुळे अनेकदा चर्चेत असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांनी सभा किंवा कार्यक्रमांमधून केलेल्या वक्तव्यांवरून अनेकजा राजकीय तर्क-वितर्कही सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. नितीन गडकरींच्या मिश्किल स्वभावामुळे त्यांच्या भाषणांमध्ये ते अनेकदा किश्श्यांचा समावेश करतात. या किश्श्यांमुळे उपस्थितांकडून नितीन गडकरींना दिलखुलास दाद मिळाल्याचंही दिसून आलं आहे. नुकत्याच राजस्थानात झालेल्या भाजपाच्या एका सभेतील गडकरींचं भाषण त्यांच्या अशाच एका विधानामुळे चर्चेत आलं आहे.
राजस्थानच्या हनुमानगढ भागातल्या गोगामेडीमध्ये मंगळवारी भाजपाच्या परिवर्तन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या वर्षाच्या शेवटी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यावेळी आपल्या भाषणात नितीन गडकरींनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर टीका केली. मात्र, त्यांनी सांगितलेल्या एका शेरमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
काय म्हणाले नितीन गडकरी? | Nitin Gadkari On Politics
“राजस्थानमध्ये आज काँग्रेसचं सरकार आहे. पण देशात मोदींचं सरकार आहे. तुम्ही राजस्थानमध्ये भाजपाचं सरकार आणा. केंद्रातही भाजपाचं सरकार आहे. राजस्थानमध्येही भाजपाचं सरकार आल्यानंतर हे डबल इंजिनचं सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल”, असं नितीन गडकरी म्हणाले.
राहुलजी माझ्या बाजूला उभे होते
“आज मी मंदिरात गेलो होतो. राहुलजी माझ्या बाजूला उभे होते. तेव्हा मंदिरातले पुजारी व भक्तगण मला विचारत होते हे मंदिर कुणी बनवलं? मी विचारलं कुणी बनवलं? तर ते म्हणाले वसुंधराजींनी बनवलं. मी म्हटलं वसुंधराजींनी आत्ता १०० कोटींचं बनवलं. तुम्ही भाजपाला निवडून द्या, मंदिराच्या भवतालचं ५०० कोटींचं काम होईल”, असं नितीन गडकरी म्हणाले.
“एक मोठे शायर एक शेर सांगायचे. मी चेष्टा करतोय, कुणाला बोलत नाही. ते म्हणायचे, “इधर गधे, उधर गधे, सब तरफ गधेही गधे.. अच्छे घोडों को नहीं है घास, और गधे खा रहे च्यवनप्राश”. समझनेवालों को इशारा काफी है”, असं नितीन गडकरी यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. शेवटी समझने वालों को इशारा काफी है म्हणत गडकरींनी हा टोला विरोधकांना असल्याचंच अप्रत्यक्षपणे सांगितल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस समर्थकांनी मात्र नितीन गडकरींची ही टीका थेट मोदींवर असल्याचा अंदाज बांधला आहे.