मुंबई,दि.६: Eknath Shinde On Maratha Reservation: मराठा आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. जालना या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाची आणि आंदोलनाची दखल आम्ही घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती की निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी जात प्रमाणपत्राचा दाखला दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. त्याप्रमाणे आज कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही निर्णय घेतला आहे की ज्यांच्या महसुली, शैक्षणिक आणि निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार. त्यासाठी जी कार्यपद्धती आहे, पडताळणी आहे ती करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केली. त्यात पाच सदस्य आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.
मराठा आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा | Eknath Shinde On Maratha Reservation
ज्या पूर्वीच्या महसुली, शैक्षणिक नोंदी ज्या निजामकालीन आहेत, त्याच्या पडताळणीचं काम ही समिती करणार आहे. महसूल सचिव समिती या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीला मदतही करेल. त्यानंतर पुढच्या एक महिन्यात निवृत्त न्यायाधीशांचा अहवाल सादर करेल. ज्यांच्याकडे जुन्या नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखले दिले जातील आणि त्यांचा फायदा होईल. त्यासाठी आपली समिती ही हैदराबाद येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधतील. मी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशीही संपर्क साधेन. ज्या काही अडचणी, त्रुटी असतील ती समिती यासाठी काम करेल. आज यासंबंधीचा जीआरही काढण्यात येईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं.
ज्यांच्याकडे जुन्या निजामकालीन नोंदी आहेत त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यासाठी आम्ही निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केली आहे. आता आमची मनोज जरांगे पाटील यांना एकच विनंती आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी आंदोलनं केली आहेत. मी त्यांच्याशी संपर्क याआधी साधला आहे आणि एक दोन दिवसही मी त्यांच्याशी बोललो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलंच होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही. आता मराठा समाजाला रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मिळवून देणं यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवल्या आहेत त्यावर आम्ही काम करतो आहोत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
टिकणारं मराठा आरक्षण देईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हा मी शब्द मनोज जरांगे पाटील आणि संपूर्ण मनोज जरांगे पाटील यांना देतो आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
जालना येथे झालेली लाठीचार्जची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याविषयी आम्ही खंत व्यक्त केली असून आम्ही त्या प्रकरणाची चौकशी करतो आहोत. मराठा समाजाविषयी आम्हाला पूर्ण आदर आहे. उपमुख्यमंत्र्यांनीही याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे. मराठा समाजाच्या आडून कुणीही राजकारण करु नये असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मी मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो आहे की त्यांनी सुरु ठेवलेलं उपोषण आंदोलन मागे घ्यावं. मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणारच आहोत. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणारच आहोत. आता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेऊन सरकारला सहकार्य करावं असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.