जालना,दि.६: Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकार मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढत नाही तोवर उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका घेणाऱ्या जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावातले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता खालावली आहे. त्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर राज्यभरातील विरोधी पक्षांनी आणि जनतेने सरकाला धारेवर धरलं आहे. त्यामुळे राज्य सरकार अखेर या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहू लागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी आता राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. (Manoj Jarange Patil On Maratha Reservation)
राज्य सरकारकडून आता मनोज जरांगे पाटलांची मनधरणी सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाने आज (५ सप्टेंबर) मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी या गावात (उपोषणाचं ठिकाण) जाऊन भेट घेतली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. यावेळी महाजन यांच्याबरोबर मंत्री संदीपान भुमरे, माजी आमदार अर्जुन खोतकरही उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांनी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्याकडे मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी वेळ वाढवून मागितला आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी आपण या उपोषणावर ठाम आहोत असं सांगितलं. तसेच उपोषण मागे घ्यावं, यासाठी माझ्यावर दबाव आणू नका, अशी विनंती जरांगे पाटलांनी गिरीश महाजनांना केली. जरांगे पाटील यावेळी म्हणाले, मी सरकारला गेल्या वेळी तीन महिने दिले होते, आता तुम्ही पुन्हा वेळ का मागताय? तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं मला वाटतं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठवाड्यातले मराठे सरसकट कुणब्यांमध्ये येतात. यासाठीचे समितीने दिलेले पुरावे तुमच्याकडे आहेतच. तेच राज्याच्या सचिवांपुढे करत तुम्हाला एक अधिसूचना काढायची आहे. तुम्ही वरिष्ठांसह सगळ्यांना म्हणायला पाहिजे की आपण जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर हा समाज आपला होईल.
एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या… | Manoj Jarange Patil On Maratha Reservation
यावेळी मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत मंत्री संदीपान भुमरे म्हणाले, “तुम्हाला यावेळी आरक्षण नाही मिळालं तर आम्ही जबाबदार राहू”. त्यावर जरांगे पाटील म्हणाले, “यावेळी नाही मिळालं तर मी समाजाचं वाटोळे केलं असं होईल. त्यापेक्षा मला असंच उपोषण करून मरू द्या. मी असाच उपोषण करताना मेलेला बरा. कारण मी सगळ्या समाजाला शब्द दिलाय. आता शेवटचं लढतोय, यावेळी आरक्षण नाही मिळालं तर एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल.” जरांगे पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, मी सगळ्यांना सांगितलंय, “बाळांनो मी जगलो तर तुमचा आणि मेलो तर समाजाचा. त्यामुळे मी असा मेलेला बरा. मी ४ फेब्रुवारीपासून लढतोय.”
जरांगे पाटलांनी निर्वाणीचा इशारा दिल्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “अशी मरण्याची भाषा करू नका”. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करतोय. आमची ही शांततेची लढाई सुरू आहे. पण तरीसुद्धा तुम्ही आमची डोकी फोडलीत.” समोर जखमी अवस्थेत बसलेल्या एका उपोषणकर्त्यांकडे बोट दाखवत मनोज पाटील म्हणाले, “ही बघा, तुमच्या पुढ्यात आहेत ही फोडलेली डोकी. आमच्या महिलांना उठता येईना, तुम्हाला त्या दिसेनात.”