मुंबई,दि.25: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर कथित 100 कोटी घोटाळ्यांचा आरोप करण्यात आला होता. त्यांना एक वर्षापेक्षा जास्त वेळ जेलमध्ये राहावं लागलं. अनिल देशमुख यांच्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर खोटे आरोप लावण्यासाठी दबाव होता. असे आरोप श्याम मानव यांनी केले होते.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना बोगस प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी फडणवीस यांनी आपल्यावर दबाव आणला होता, असा धक्कादायक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. त्यासाठी खोटी प्रतिज्ञापत्रे बनवावीत म्हणून त्यांनी दडपणही आणले होते, असे सांगतानाच, हा केवळ आरोप नाही तर त्याचे ठोस पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही देशमुख यांनी केला. तसेच फडणवीसांचे पुढील कारस्थान जगासमोर आणणार, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा देवेंद्र फडणवीस यांनी दिला इशारा, म्हणाले मी कधी कोणाच्या…
प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विश्वासातील एका व्यक्तीला आपल्याकडे पाठवले होते. चार मुद्दय़ांवर खोटी प्रतिज्ञापत्रे बनवून दिल्यास कोणतीही कारवाई होणार नाही, अशी ऑफर त्याच्यामार्फत फडणवीस यांनी दिली होती. ती व्यक्ती अनेकदा आपल्याकडे आली होती आणि तिने फडणवीस यांच्याबरोबर बोलणे करून दिले होते, असेही देशमुख यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि मी गृहमंत्री होतो त्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना आपल्यावर शंभर कोटी गोळा केल्याचा खोटा आरोप करायला लावला. त्या प्रकरणी कारवाई न करण्यासाठी फडणवीस यांनी ही खोटी प्रतिज्ञापत्रे देण्यास सांगितले होते; परंतु आपण त्यास नकार दिला, अशी माहितीही अनिल देशमुख यांनी या वेळी दिली. पुढील चार मुद्दय़ांवर फडणवीसांनी प्रतिज्ञापत्रे बनवून मागितली होती, असे ते म्हणाले.
1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री म्हणून मला ‘वर्षा’ निवासस्थानी बोलावले आणि सांगितले की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यासाठी मला पैशांची गरज आहे, आपण मला तीनशे कोटी रुपये जमा करून द्या.
2. पोलिसांकडून गृह मंत्र्यांना मिळालेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूत याची आधीची मॅनेजर दिशा सालियान हिच्या पार्टीला आदित्य ठाकरे गेले होते. तिथे आदित्य ठाकरे यांनी ड्रिंक घेतल्यावर दिशावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने आरडाओरड करायला सुरुवात केली तेव्हा आदित्य यांनी तिला बाल्कनीतून खाली फेकले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.
3. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील कार्यालयात मंत्री म्हणून मला बोलावून घेतले. तिथे त्यांचा मुलगा पार्थ पवार उपस्थित होता. महाराष्ट्रात गुटखा आणि पानमसाल्याचा मोठा धंदा आहे. त्यांच्याकडून आपल्याला पैसे वसुली करायची आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पैसे वसुलीचे काम पार्थ पवार करतील. तुम्ही फक्त गृह मंत्री म्हणून त्यांना मदत करा.
4. तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी गृहमंत्री म्हणून मला सांगितले की, दापोलीच्या साई रिसॉर्टमध्ये त्यांचेच पैसे लागलेले आहेत. फक्त कागदोपत्री मालकी सदानंद कदम यांची दाखवण्यात आली आहे. त्या प्रकरणात तक्रार झाली तर गृहमंत्री म्हणून मदत करा.