नवी दिल्ली,दि.6: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, अजित पवार गटाने मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज पहिल्यांदा प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: आयोगाच्या कार्यालयात उपस्थित आहेत. त्यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते देखील दाखल झाले आहेत. शरद पवार या सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहिल्याने सध्याच्या घडामोडींना अतिशय जास्त महत्त्व प्राप्त झालंय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, अजित पवार गटाचा मोठा दावा
मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन आयुक्त यांच्यासमोर ही सुनावणी पार पडत आहे. सुनावणीदरम्यान शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेचा दाखला देण्यात आला. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनुसिंघवी यांच्याकडून पक्षाच्या घटनेची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. दरम्यान, अजित पवार गटाकडून 1 लाख 62 हजार प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे 43 आमदार आणि नागालँडमधील आमदारांच्या प्रतिज्ञापत्राचा समावेश आहे. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यामुळे आमदारांची संख्या महत्त्वाची आहे आणि आमच्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचा दावा अजित पवार गटाने केला. तसेच शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात आणि जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीच बेकायदेशीर असल्याचा दावाही अजित पवार गटाने केला.
शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात
पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार यांची 30 जूनलाच निवड करण्यात आलीय. याची माहिती निवडणूक आयोगाला 30 जूनलाच देण्यात आल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा दावा अजित पवार गटाने केलाय. जयंत पाटील यांच्या निवडीचा घटनाक्रम मांडण्यात आलाय. पाटलांची नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आधीच करण्यात आली होती. शरद पवार यांच्याकडून पक्षात मनमानी केली जाते. एकाच सहीवर नियुक्ती केली जाऊ शकत नाही, असा दावा अजित पवार गटाने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेलाय. त्यामुळे आमदारांची संख्या आता महत्त्वाची आहे. त्याआधारेच पक्ष ठरवता येईल, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. महाराष्ट्रातील 53 आमदारांपैकी 43 आमदार आमच्यासोबत आल्या आहेत. तसेच विधान परिषदेच्या 9 पैकी 6 आमदार आमच्यासोबत आहे. लोकसभेचे एक आणि राज्यसभेचा एक खासदार आमच्यासोबत आहे. तसेच नागालँडचे सर्व सात खासदार आमच्यासोबत आहेत, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. 1 लाख 62 हजार प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. अजित पवार गटाकडून 24 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय.