नवी दिल्ली,दि.6: NCP: आज राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. राष्ट्रवादी कोणाची शरद पवार की अजित पवार यांची? निवडणूक आयोग काय निर्णय देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: नवी दिल्लीत सुनावणीला उपस्थित आहेत. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना आज निवडणूक आयोगात रंगला. शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह हे युक्तिवाद करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाची? याचं उत्तर या सुनावणीत मिळणार आहे.
अजित पवारांनी बंड केल्याने पक्षात फूट
अजित पवार यांनी गत जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी केली होती. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी बड्या नेत्यांनीही शरद पवार यांची साथ सोडली होती. त्यानंतर ही मंडळी भाजप – शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी झाली. त्यात अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री झाले, तर अन्य आमदार कॅबिनेट मंत्री झाले. या घटनाक्रमानंतर या गटाने थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्हावर दावा सांगितला. यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. त्यानुसार, निवडणूक आयोग या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी घेऊन राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह कुणाचे यावर फैसला देणार आहे.
शरद पवार गटाच्या कार्यसमितीची गुरुवारी यासंबंधी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत निवडणूक चिन्ह गोठवण्यात आले, तर पुढची रणनीती काय असेल? याविषयीची चर्चा झाली.
आतापर्यंत सुनावणीत काय झालं?
अजित पवार गट संख्याबळ
53 पैकी 43 आमदार
विधानपरिषद 9 पैकी 6 आमदार
नागालँड 7 आमदार
झारखंडः 1
1 लाख 62 हजार शपथ पत्र
28 राज्याचे प्रतिज्ञापत्र आपल्या बाजूने असल्याचा अजित पवार गटाचा दावा.
घटनाक्रम
2 जुलै रोजी अजित पवार गटाचा शपथविधी
शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात 5 जुलै रोजी कॅव्हिएट दाखल
अजित पवार गटानं 30 जून रोजीच झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाल्याचा दावा केला, 40 आमदार आपल्या बाजूनं असल्याचाही दावा
निवडणूक आयोगानं त्यावर दोन्ही बाजूंना नोटीसा देत 8 सप्टेंबर पर्यंत आपली बाजू मांडण्यास सांगितलं
दोन्ही बाजूची कागदपत्रं पाहिल्यानंतर आयोगानं आता या सुनावणीसाठी 6 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे.