सोलापूर,दि.२२: Nana Patole Solapur: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापुरात मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पंतप्रधान करणं हे माझं लक्ष्य आहे. त्यामुळे माझं तुमचं सगळ्यांना आवाहन आहे की आपण सगळे त्या दृष्टीने तयारीला लागा. खासदार निवडून देण्याची हमी तुमच्याकडून हवी आहे. इथे कुणीही येईल आणि काहीही बोलून जाईल त्याने काही फरक पडत नाही. ही लढाई काँग्रेसची आहे. ज्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या काँग्रेसने देशाला महासत्ता केलं त्यांना प्रश्न विचारला जातोय ७५ वर्षात काय केलं? त्यांना आपण काय करु शकतो हे दाखवून द्या असं वक्तव्य नाना पटोलेंनी सोलापुरात केलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे सोलापूर विमानतळासमोर स्वागत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी केले. यावेळी नागेश हत्तुरे, संदेश हत्तुरे, सिद्धार्थ हत्तुरे, नागेश पडणुरे, कलशेटी आदी उपस्थित होते.
नाना पटोले यांचे मोठे वक्तव्य | Nana Patole Solapur
काँग्रेसने बँका, एलआयसी असे अनेक सार्वजनिक उपक्रम तयार केले. जनतेच्या पैशांतून जनतेसाठी हे उपक्रम आपण तयार केले आहेत. ते उपक्रम हे सरकार रोज विकून खात आहेत. ज्या काँग्रेस पक्षाचे आम्ही शिपाई आहोत, त्या शिपायाची जबाबदारी आहे की काँग्रेस पक्ष जिंकला पाहिजे. स्वातंत्र्याच्या लढाईत काँग्रेसचा शिपाई लढला तसा या निवडणुकीत लढायचं आहे असंही आवाहन नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं. आपल्या देशासाठी राजीव गांधींनी खूप मोठं काम केलं. ज्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा विमान चालवणारा देश काय चालवणार? अशी टीका भाजपाने केली होती. अशा भाजपाची खरं तर मला कीव येते. राजीव गांधी यांनी देश कसा चालवतात याचं उदाहरण राजीव गांधींनी घालून दिलं. राजीव गांधी कायमच म्हणायचे की या देशात प्रत्येक व्यक्तीच्या हातात जग आलं पाहिजे. ट्रंक कॉल करायला दिवस-दिवस लागायचा. संगणक राजीव गांधी यांनी आणला. कॉम्प्युटर इंजिनिअर जगाच्या पाठीवर बघायला मिळतात ही देणगी राजीव गांधींची आहे. त्यांना पंतप्रधान म्हणून अल्पकाळ मिळाला पण त्यांचं काम खूप मोठं आहे असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
आज देशात काय स्थिती आहे? देशाच्या जनतेला लुटणं, त्यांना गरीब करणं आणि पुन्हा त्यांना गुलामीकडे आणणं अशी मानसिकता असलेला भाजपा पक्ष सत्तेवर आहे. भाजपाला या देशाची लोकशाही मान्य नाही. महाराष्ट्रात एका काळ्या टोपीवाल्याला राज्यपालपदावर बसवलं होतं. त्या काळ्या टोपीवाल्याने राज्यपालाच्या खुर्चीवर बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, सावित्रीबाईंचा अपमान केला. यातून भाजपाची मानसिकता काय आहे ते कळतं असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.