मनोज जरांगे यांचे चॅलेंज म्हणाले, नाही तर नाव बदलतो; लक्ष्मण हाके म्हणाले, ओबीसी एकत्र आला तर

0

जालना,दि.21: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी चॅलेंज दिले आहे. तर ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी उपोषण सुरू केले आहे. राज्यात मराठा विरूध्द ओबीसी अशी परिस्थिती निर्माण होत आहे. जालन्याच्या वडीगोद्री गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर मनोज जरांगे म्हणाले, ओबीसी आंदोलक आमचे विरोधकच नाहीत. तो येवलावाला काड्या करत आहे. लक्ष्मण हाकेंना भुजबळांनीच उभे केले आहे. ओबीसी आंदोलनाला भुजबळच सगळे पुरवत आहेत.

दोन समाजात वाद लावण्याचे काम सुरू आहे. आम्ही मराठ्यांनी हे सुरू केले नाही. ओबीसी आंदोलनामागे येवलेवाले आहेत. त्यांनीच दोन जणांना हाताशी धरून उभे केले आहे. तुम्ही आमची शाळा करणार का, राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलतो, मग तुम्ही किती पळता ते पाहतो, या शब्दांत मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

माझ्यासमोर बोलायची लायकी नाही

“मिस्टर जरांगे तुम्हाला आरक्षणातलं पॉईंट शुन्यसु्द्धा ज्ञान नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली. मंडल आयोग लागू होऊन 27 ते 28 वर्षे झाली आहेत आणि 70 वर्षांचा जावयी शोध जरांगे काढला कुणी? म्हणून मी कायम सांगतो, जरांगे तुमची माझ्यासमोर बोलायची लायकी नाही. तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोलायला सांगा. कारण मंडल आयोग 1993-94 मध्ये लागू झाला, आणि 70 वर्षे आणले कुठून? अरे याला आधी शिक्षण द्या. याला अगोदर पॉलिसी शिकवा. माझी चिडचिड होते मला मान्य आहे. मी थोडसं एकेरी बोलतोय. पण आमच्या या वेदना आहेत, म्हणून हे शब्द येत आहेत. 70 वर्षे कुणाचे खायचा प्रश्नच येत नाही. 27 वर्षांत काय मिळालं?”, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.

लक्ष्मण हाके म्हणाले, ओबीसी ने रिझर्वेशन खाल्ल असतं तर ओबीसीचे 400 कारखाने दिसले असते. आज राज्यात 250 साखर कारखाने आहेत. त्यापैकी 90 टक्के कारखाने हे मराठा समाजाचे आहेत. भुजबळांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना, तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा?

जातीयवाद कोण करतंय?

“जरांगे तुम्ही म्हणता मी जातियावाद केला नाही. छगन भुजबळ असतील, प्रकाश शेंडगे असतील, लक्ष्मण हाके असेल, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, मुंडे भाऊ-बहीण, विजय वडेट्टीवार असतील, ही माणसं या महाराष्ट्रातील जाती-उपजातीसह 492 जातींची भाषा बोलतात आणि जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा करतात. मग जरांगे नक्की जातीयवादी कोण?”, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. “या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवं आहे. आम्ही गेली सात-आठ महिने शांत बसलो. तुमची प्रत्येक गोष्ट पाहत राहिलो. जरांगे तुमची संविधानिक मार्गाने आंदोलने चालू होती ते आम्ही पाहत होतो. पण जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं. टार्गेट करुन ओबीसी नेत्यांची कार्यालये, दुकानं, घरे जाळली. जरांगे जातीयवाद कोण करतंय?”, असं लक्ष्मण हाके म्हणाले.

राजकारण विसरावं

मराठवाड्यातील ओबीसी एकत्र येतोय, आता पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी एकत्र आला तर मनोज जरांगे यांनी राजकारण विसरावं असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके हे वडीगोद्री या गावात उपोषणाला बसले आहेत. त्यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here