Home महाराष्ट्र पक्ष आणि नेता नसेल आमचा बाप, मराठ्यांवर अन्याय कराल तर थेट करू...

पक्ष आणि नेता नसेल आमचा बाप, मराठ्यांवर अन्याय कराल तर थेट करू साफ!

0

सोलापूर,दि.१३: पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या शेवटी तांदुळवाडी येथे आयोजित सांगता सभेत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर थेट शब्दांत निशाणा साधला.

मराठा समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव

सभेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सध्याच्या राजकीय वातावरणात छगन भुजबळ अत्यंत खूश असून निवांत झोप घेत असतील. आपल्याला कोणतेही मंत्रीपद किंवा राजकीय पक्ष नको असून केवळ समाजातील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा लढा उभारला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “तुमचा आणि आमचा थेट संबंध नव्हता, मग या आंदोलनात मिठाचा खडा टाकण्याचे पाऊल कोणी उचलायला लावले? सरकारने मराठा समाज आणि माझ्यामध्ये गैरसमज पसरवून आंदोलन तोडण्याचा भयंकर प्लॅन आखला आहे.”

देवेंद्र फडणवीसांना इशारा अन् २८ ऑगस्टचा अल्टीमेटम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देत जरांगे पाटील म्हणाले, “वर्षभरात मी तुम्हाला एका शब्दानेही दुखावले नाही. परंतु, क्षत्रिय मराठ्यांच्या नादाला लागणे आता बंद करा. २८ ऑगस्टपर्यंत शांत राहा, त्यानंतर मराठे कसे आक्रमक होतात ते पाहा. मराठ्यांच्या विरोधात कट-कारस्थाने रचण्याच्या भानगडीत पडू नका. आम्ही मराठे ही कोणाच्या बापाला किंवा मारायला घाबरणारी औलाद नाही.”

सत्तेतील नेत्यांच्या भूमिकेवर तीव्र सवाल

सत्तेतील नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत जरांगे यांनी विचारले, “कोण फडणवीस? कोण शिंदे? तुम्हाला मोठे करून आम्ही काय चूक केली का? आमच्या स्वप्नांची आणि संसाराची राखरांगोळी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना, “आज शिंदे साहेबांचे काय हाल झाले आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला दिसत आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

२९ ऑगस्टच्या आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन

आपल्या भाषणाचा शेवट करताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एकजुटीची हाक दिली. “पक्ष आणि नेता हा मराठ्यांचा बाप असू शकत नाही. जेव्हा समाजावर अन्याय होईल, तेव्हा पक्षाला लाथ मारून एकत्र या. मी समाजासाठी प्राणाची बाजी लावायला आणि मरायलाही तयार आहे. २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाला भेट देण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन त्यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.