Home महाराष्ट्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवी घोषणा; ‘जंतर-मंतर सिझन २’ची काय आहे योजना?

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवी घोषणा; ‘जंतर-मंतर सिझन २’ची काय आहे योजना?

0

छत्रपती संभाजीनगर,दि.१३: दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीने (CJP) तीव्र आंदोलन छेडल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनाला संपूर्ण देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला होता. या घडामोडीनंतर आता सीजेपीने आपली राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली असून, पक्षाचा विस्तार देशभरात करण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घडवून आणल्यानंतर सीजेपी पुढे काय करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले असतानाच पक्षाचे नेते अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी एका नव्या मोहिमेची मोठी घोषणा केली आहे.

१५ ऑगस्टपासून शाळा सुधार मोहीम

देशातील शिक्षण व्यवस्थेत मूलभूत आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सीजेपीतर्फे येत्या १५ ऑगस्टपासून एका विशेष उपक्रमाची सुरुवात केली जात आहे. सरकारी शाळांचा दर्जा सुधारावा, यासाठी ही विशेष मोहीम राबवली जाणार असून, अभिजीत दीपके स्वतःच्या हिंगोली जिल्ह्यातील मूळ गावातील शाळेपासून या उपक्रमाची अंमलबजावणी करणार आहेत.

जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलनाची तयारी

माध्यमांशी संवाद साधताना दीपके म्हणाले की, दिल्लीतील पहिल्या आंदोलनानंतर अनेक नागरिक सोशल मीडियावर ‘जंतर-मंतर सिझन २’ कधी येणार, असा प्रश्न विचारत होते. त्यामुळे लवकरच नव्या ज्वलंत मुद्द्याला घेऊन जंतर-मंतरवर दुसरे मोठे आंदोलन उभे केले जाईल. दरम्यान, बुधवारी दिल्लीत आयोजित केलेली पक्षाची बैठक ऐनवेळी रद्द करावी लागली. सत्ताधारी भाजपच्या दबावामुळे आम्हाला बैठकीसाठी हॉल उपलब्ध करून दिला जात नाहीये, असा थेट आरोपही दीपके यांनी केला आहे.

इतर राज्यांतील आंदोलनांना पाठिंबा

सध्या झारखंडमध्येही नोकरी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला सीजेपीने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घडवून आणल्यानंतर आता १५ ऑगस्टची शाळा सुधार मोहीम आणि जंतर-मंतरवरील ‘सिझन २’ आंदोलनाच्या माध्यमातून सीजेपी नक्की काय कमाल करणार, याविषयी सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.