Home महाराष्ट्र सकाळीच हादरली जमीन! ‘या’ दोन जिल्ह्यांत भूकंपाचे तीव्र हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळीच हादरली जमीन! ‘या’ दोन जिल्ह्यांत भूकंपाचे तीव्र हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
प्रतिकात्मक फोटो

हिंगोली,दि.४: गेल्या दोन महिन्यांच्या शांततेनंतर हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत शनिवारी पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र हादरे बसले. सकाळी-सकाळीच अचानक जमीन हादरल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली असून अनेक ठिकाणी लोक भितीपोटी घराबाहेर पडले.

अवघ्या दोन तासांत बसले दोन मोठे हादरे

शनिवारी सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांनी ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला धक्का बसला. यानंतर अवघ्या दोन तासांच्या आत, म्हणजेच सकाळी ९ वाजून ४३ मिनिटांनी ४.५ रिश्टर स्केलचा दुसरा शक्तिशाली धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील ‘गढाळा’ हे गाव आहे.

सकाळी ७:४७ ते १० वाजेच्या दरम्यान एकूण चार सूक्ष्म धक्के जाणवले, ज्यांपैकी दोन धक्क्यांची सिस्मोग्राफवर अधिकृत नोंद झाली आहे.

घरांना पडल्या भेगा; नागरिक मोकळ्या जागेत

भूकंपाच्या या तीव्र हादऱ्यांमुळे वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातील काही कच्च्या-पक्क्या घरांच्या भिंतींना बारीक भेगा पडल्या आहेत. अचानक भांडी आणि घरातील वस्तू हादरू लागल्याने नागरिकांनी लहान मुले व वृद्धांसह मोकळ्या मैदानात धाव घेतली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झालेले नाही.

भूस्तरातील फॉल्ट लाईनमुळे हादरे: तज्ज्ञांचा दावा

छत्रपती संभाजीनगर येथील खगोल व भूगर्भ अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आणि लगतच्या भूस्तरात ‘किन्नरसानी’ आणि ‘गोदावरी खोऱ्यात’ विभंग रेषा (Fault Lines) आहेत. या पठारी भागातील भूस्तरांमध्ये असलेल्या विभंग रेषांमुळे भूगर्भात हालचाली होऊन वारंवार भूकंपाचे धक्के बसतात. या क्षेत्राचा सखोल शास्त्रीय अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हिंगोली व नांदेड जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.