Home राजकारण पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले शेतकऱ्यांना कधी मिळणार मदत

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले शेतकऱ्यांना कधी मिळणार मदत

0

सोलापूर,दि.५: सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनामार्फत शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पंचनाम्यांचे अहवाल शासनाला सादर झाल्यानंतर निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच अडचणी सोडवण्यासाठी शासन व प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी दिली.

दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गोरे यांनी माढा तालुक्यातील तुळशी येथील शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, रणजीत शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, माढा उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील दुष्काळ लक्षात घेता महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागामार्फत पीक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या १०० टक्के क्षेत्राचे पंचनामे करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून किंवा भरपाईपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पंचनाम्यांची कार्यवाही अचूक व पारदर्शकपणे पूर्ण करून अहवाल शासनाला पाठवला जाईल आणि त्यानंतर मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यावेळी तुळशी गावातील शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली. हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. तसेच गावात पाणीटंचाई भासू नये यासाठी योग्य नियोजन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीत पीक नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करणे आणि पाणी व चाऱ्याची उपलब्धता करणे याला प्राधान्य दिले जात असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.