नवी दिल्ली,दि.१३: शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि अधिकाराबाहेरचा होता, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. सलग पाचव्या दिवशी युक्तिवाद करताना सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची कार्यपद्धती आणि शिंदे गटाच्या भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.
२०१८ च्या घटनेवर आताच आक्षेप का?
युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की, शिवसेनेचा संपूर्ण कारभार हा पक्षाच्या घटनेनुसारच चालत होता आणि रीतसर संघटनात्मक निवडणुका पार पडल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी स्वतः २०१८ च्या पक्षाच्या घटनेचा स्वीकार केला होता आणि त्याच घटनेच्या आधारे ते आमदार व मंत्री बनले. अनेक वर्षे ज्या घटनेला विरोध केला नाही, त्याच २०१८ च्या घटनेवर शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोरील सुनावणीच्या अंतिम टप्प्यात अचानक अलोकतांत्रिक असल्याचा ठपका कसा ठेवला? असा थेट प्रश्न सिब्बल यांनी विचारला.
जनता दल प्रकरणाचा संदर्भ पूर्णपणे गैरलागू
निवडणूक आयोगाने आपला निर्णय देताना १९९४ च्या ‘जनता दल’ प्रकरणाचा आधार घेतला होता. यावर सिब्बल यांनी स्पष्ट केले की, जनता दल प्रकरणात पक्ष तदर्थ (ad hoc) व्यवस्थेवर चालत होता आणि तिथे नियमित निवडणुका झाल्या नव्हत्या. मात्र शिवसेनेच्या बाबतीत कोणतीही तदर्थ समिती नव्हती. त्यामुळे जनता दलाच्या खटल्याचा संदर्भ या प्रकरणाला जोडणे अत्यंत चुकीचे आहे. उलट, पूर्वसूचना न देता अचानक निर्णय न घेण्याचा जनता दल प्रकरणातील नियम ठाकरेंच्या बाजूनेच जातो, असा दावा त्यांनी केला.
‘फक्त आमदारांच्या संख्येवर निर्णय, ग्राऊंडवर परिस्थिती वेगळी’
कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, केवळ लोकप्रतिनिधींच्या (आमदारांच्या) संख्येचा विचार करून एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. परंतु, प्रत्यक्ष जमिनीवरील (ग्राऊंड लेव्हल) संघटनात्मक परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. पक्षाचे मूळ कार्यकर्ते आणि आधार ठाकरेंच्याच पाठीशी होता.
निवडणूक आयोगाने कोणतीही पूर्वसूचना न देता शिवसेनेची घटना अलोकतांत्रिक ठरवली आणि तोच निष्कर्ष पक्षाचे चिन्ह आणि नाव हिरावून घेण्यासाठी वापरला, असा घणाघाती आरोप करत सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ठाकरे गटाच्या या आक्रमक युक्तिवादामुळे सर्वोच्च न्यायालयातील ही सुनावणी आता अत्यंत निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे.








