मुंबई,दि.२३: Manipur Violence: भाजपा आमदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करण्यात आलं आणि धिंड काढत सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरातून संतापजनक प्रतिक्रिया आल्या. इतकंच नाही, तर सर्वोच्च न्यायालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या व्हिडीओची दखल घेत प्रतिक्रिया दिली.
यानंतर विरोधकांनी आरोप केला की, मणिपूरमध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक हिंसाचार होत असताना मोदी गप्प होते. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर मोदी बोलले. आता मणिपूरमधील भाजपाच्या एका आमदारानेही मोदींच्या भूमिकेवर आणि प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते ‘न्यूजलाँड्री’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
भाजपा आमदाराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका | Manipur Violence
मणिपूरमधील सत्ताधारी भाजपाचे आमदार पाओलीनलाल हाओकिप म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूर हिंसाचारावर मौन सोडण्यासाठी एक व्हिडीओ व्हायरल व्हावा लागला हे खूप दुर्दैवी आहे. अशाप्रकारचा हिंसाचार होत असेल, तर ७९ दिवसांचा उशीर तर सोडाच, पण एखादा आठवडा उशीर होणे हाही खूप मोठा काळ आहे. ही शांतता बधिर करणारी आहे.”
नरेंद्र मोदींचा प्राधान्यक्रम चुकत आहे
“कुकी समाजाचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्राधान्यक्रम चुकत आहे. मी स्वतः पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याआधी कुकी समाजाच्या प्रतिनिधी मंडळाच्या भेटीसाठी प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आजही आम्ही पंतप्रधानांच्या भेटीसाठी वेळ मिळण्याची वाट पाहतो आहे. जेणेकरून आम्ही त्यांना मणिपूरमधील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देऊ शकू,” असं हाओकिप यांनी सांगितलं.
राज्य सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही
आमदार पाओलीनलाल हाओकिप पुढे म्हणाले, “माझ्या समाजाचा नेता म्हणून ही शांतता माझ्यासाठी खूप निराशाजनक आहे. एक देश म्हणून आपल्या सर्वांना पक्षांच्या पलिकडे जाऊन विचार करायला हवा. आज ज्या कुकी समाजावर अत्याचार होत आहे त्यांच्याविरोधात वातावरण निर्माण करण्यात मणिपूरचे मुख्यमंत्री आघाडीवर होते. आम्हाला राज्य सरकारकडून न्यायाची कोणतीही अपेक्षा नाही.”
पाओलीनलाल हाओकिप यांच्यासह मणिपूरमधील कुकी समाजातील १० आमदारांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह आदिवासींचं रक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप केला. तसेच राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी वेगळ्या प्रशासनाची मागणी केली आहे. “३ मे रोजी मणिपूरमध्ये बहुसंख्य मैतेई समाजाने कुकी समाजावर सुरू केलेल्या अत्याचाराला विद्यमान राज्य सरकारचं पाठबळ आहे,” असाही आरोप हाओकिप यांनी केला.
त्यातील घटनेसारख्या चार घटना घडल्या आहेत
हाओकिप म्हणाले, “मणिपूरमधील जो व्हिडीओ व्हायरल झाला त्यातील घटनेसारख्या चार घटना घडल्या आहेत. या घटनांची दखल घेण्यासाठी मुख्यमंत्री बिरेन सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदींना व्हिडीओची आवश्यकता आहे का? अशा अमानवी घटनांविरोधात कारवाई करणे राज्य सरकारची जबाबदारी नाही का? व्हिडीओ समोर आल्यावर आपल्याला या घटनेविषयी कळाल्याचं मुख्यमंत्री बिरेन सिंह सांगतात. मात्र, ही घटना दोन महिन्यांपूर्वीच घडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असं बोलून या घटनांवर सारवासारव करत आहेत.”