मुंबई,दि.१०: आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुरू आहे. १३ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणीची तारीख असून या पार्श्वभूमीवर आता शिवसेना कुणाची, हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ सचिवांनी नोटीस पाठविली आहे. आठवडाभरात पक्षासंदर्भात कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश या नोटिसीच्या माध्यमातून देण्यात आले.
स्थानिक पातळीवर किती आमदार, खासदार व अन्य पदाधिकारी आहेत यासह अन्य पुराव्यांची कागदपत्रे दोन्ही गटांना विधानसभा सचिवांकडे जमा करावी लागणार आहेत.
सुनावणी कधी?
विधानसभा अध्यक्षांनी १३ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबरपर्यंतच्या वेळापत्रकात शिवसेना कुणाची? याबाबतच्या सुनावणीचा कोणताही उल्लेख नाही.
त्यामुळे आता यावर नेमकी कधी सुनावणी होणार आणि त्याचा निकाल काय येणार ही उत्सुकता ताणली गेली आहे.
राष्ट्रवादी व शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी एकत्रच
अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी करणाऱ्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली.