अहमदनगर,दि.9: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. महाजन-मुंडे यांच्यामुळे 1995 मध्ये महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली मात्र त्यांच्या मुलींना कशी वागणूक मिळते? हे अत्यंत वाईट आहे, पंकजा मुंडे यांचं मला कौतुक वाटतं कारण ती एकटी लढत आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे बोलत होत्या.
‘पाच वर्षात तीन वर्ष मला आठवतंय पंकजाताई अनेकवेळा पवार साहेबांना भेटायच्या. आपण कधीही यामध्ये राजकारण आणलं नाही. निवडणुकीवेळी टोकाची भूमिका घेऊन एकमेकांविरुद्ध लढू पण जेव्हा ऊस तोडणी कामगारांचा विषय असेल तेव्हा आम्ही पंकजाताईंचा मानसन्मान नेहमीच केलेला आहे. आजही करू आणि उद्याही करू, कारण ती एक लढाऊ महिला आहे. मी हे राजकारणासाठी म्हणत नाही, त्या मुलीबद्दल मला प्रेम वाटतंय, कारण ती एकटी लढते. तिचे वडील गेले आहेत, तिच्या कुटुंबात कुठला कर्ता पुरुष नाहीये,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
‘1995 साली त्यांची सत्ता आली तेव्हा दोन लोकांनी महाराष्ट्रात रान पेटवलं, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे. हे दोघंही आज हयात नाहीत, पण त्यांच्या मुलींना भाजप काय पद्धतीने वागणूक देतंय? बेटी पढाव, बेटी बचाव म्हणताना आधी आमच्या या दोन बेट्यांचा करा, तुम्हाला जमत नसेल तर मोठी बहीण म्हणून मी करेन,’ असा निशाणा सुप्रिया सुळे यांनी साधला आहे.