बंगळुरू,दि.१७: सोशल मिडीयावर एका महिला डॉक्टरचा तिच्या सासू सासऱ्यांचा छळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सुनेकडून सासू सासऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत बंगळुरू येथील डॉ. प्रियदर्शिनी या त्यांच्या सासू सासऱ्यांसोबत भांडताना दिसत आहे. व्हिडीओत उच्चशिक्षित लोकांना संस्कार नसल्याचे दिसून येते. वयोवृद्ध सासू सासरे यांचा छळ केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दैनिक सामनाने याबाबत वृत्त दिले आहे.
व्हिडीओत डॉ. प्रियदर्शिनी या त्यांच्या सासू सासऱ्यांसोबत भांडताना दिसत आहे. तसेच त्यांची मुलगी आपल्या आजोबांच्या पाठित लाथा मारत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ गेल्या तीन चार दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर आता कर्नाटक वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. प्रियदर्शिनी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
बंगळुरूतील प्रसिद्ध व्हिक्टोरिया हॉस्पिटलच्या बंगळुरू मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रियदर्शिनी या इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर आहेत. त्यांचे त्यांच्या पतीसोबत तसेच सासरच्या मंडळीसोबत पटत नसल्याने त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. संपत्तीवरून सध्या प्रियदर्शिनीचे सासरच्या कुटुंबियांसोबत वाद सुरू आहेत.
दैनिक सामनाने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणी वैद्यकीय विभाग मुख्य अधिकारी डॉ. सुजाता राठोड यांनी प्रियदर्शिनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. वैद्यकीय विभागाचे मुख्य सचिव मोहम्मद मोहसिन यांनी प्रियदर्शिनी यांना यावर तत्काळ लिखीत स्वरूपात आपले उत्तर द्यावे नाहीतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.