Karnataka Election News: कर्नाटकात प्रथमच व्होट फ्रॉम होम अर्थात घरातून करता येणार मतदान

0

बंगळुरू,दि.30: Karnataka Election News: कर्नाटकात प्रथमच व्होट फ्रॉम होम (Vote From Home) अर्थात घरातून करता मतदान येणार आहे. आजपर्यंत वर्क फ्रॉम होम ऐकले व अनुभवले होते. आता व्होट फ्रॉम होम अनुभवता येईल. कर्नाटकमध्ये (Karnataka Election) आठवड्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व पक्ष तसेच निवडणूक आयोग (Election Commission of India) करत आहेत. कर्नाटकात प्रथमच व्होट फ्रॉम होम (Vote From Home) अर्थात घरातून मतदानाचा पर्याय जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाने आज (30 एप्रिल) या मोहिमेला सुरुवात केली आहे.

निवडणूक आयोगाने राज्यभरात 80 वर्षांवरील वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरातून मतदान करण्याची व्यवस्था केली आहे. निवडणूक आयोग आणि पोलिंग एजंटचे पाच सदस्यीय पथक त्यांच्या घरी जाऊन त्यांचं मत घेतील. त्याचबरोबर या कक्षेत येणाऱ्या सर्व मतदारांना 6 मेपर्यंत या प्रक्रियेद्वारे मतदान करता येणार आहे.

कसं होणार व्होट फ्रॉम होम? | Vote From Home

कर्नाटकातील मतदार ज्यांनी घरबसल्या मतदानाचा पर्याय निवडला आहे त्यांना त्यांच्या घरी राहून मतदानाची सर्व सुविधा मिळेल आणि ते त्यांच्या स्वेच्छेने मतपत्रिकेद्वारे मतदान करु शकतील. यासाठी निवडणूक आयोगाने मतदान एजंटच्या 5 सदस्यीय टीमची नियुक्ती केली आहे, ज्यामुळे या प्रक्रियेदरम्यान कोणताही गैरप्रकार होणार नाही. या पथकामध्ये ज्यामध्ये दोन मतदान अधिकारी, एक निरीक्षक आणि पक्ष एजंटसह पोलीस पथकही घटनास्थळी उपस्थित राहणार आहे. मतदान संपल्यानंतर मतपेटी सुरक्षित स्ट्राँग रुममध्ये ठेवली जाईल.

दरम्यान ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून व्हिडीओग्राफरचीही नियुक्ती करण्यात आली आहे, जेणेकरुन या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओग्राफी करता येईल. मतदारसंघानुसार, प्रत्येक प्रभागातील वेगवेगळी पथके या मतदारांच्या घरी मतपत्रिका घेऊन त्यांची मते गोळा करतील. उमेदवारांच्या पोलिंग एजंटना आधीच माहिती दिली जाईल, जेणेकरुन या प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी ते देखील मतदान प्रक्रियेदरम्यान उपस्थित राहतील.

पाच टक्क्यांपेक्षा कमी मतदारांनी लाभ घेतला | Karnataka Election News

कर्नाटकच्या मतदार यादीनुसार, मार्च 2023 पर्यंत राज्यात 80 ते 99 वयोगटातील 12.2 लाख लोक आहेत. त्याचवेळी राज्यात विशेष दिव्यांगांची संख्या 5.6 लाख आहे. यासोबतच 100 वर्षांवरील लोकांची आकडेवारी पाहिल्यास इथे 16 हजारांहून अधिक मतदार आहेत. ज्यामध्ये बंगळुरुमध्ये 8,500 हून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि 100 हून अधिक दिव्यांगांनी ‘व्होट फ्रॉम होम’साठी नावनोंदणी केली आहे. असं असूनही, एकूण लोकसंख्येच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी मतदारांनी त्याचा लाभ घेतला आहे.

कर्नाटक विधानसभेच्या सर्व 224 जागांसाठी 10 दिवसांनी म्हणजेच 10 मे रोजी मतदान होणार आहे, त्यानंतर 13 तारखेला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. या निवडणुकीत भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here