कोल्हापूर,दि.30: Kolhapur: निवडणुका म्हटले की मतांसाठी पैसे वाटण्याचे प्रकार सर्रास सुरू असतात. मग ती निवडणूक विधानसभा, लोकसभा, ग्रामपंचायत किंवा बाजार समितीची असो. निवडणुकीत मतांसाठी पैसे वाटल्याचे अनेक प्रकार समोर येतात. मात्र हे दिलेले पैसे एका मतदाराने चक्क मतपेटीत टाकून परत केल्याची प्रकार कोल्हापूरमध्ये घडला आहे. साखर कारखान्यांसह बाजार समित्यांच्या निवडणुकीत बरेच सर्वसामान्य मतदार मतासह चिट्टी सुद्धा मतपेटीत टाकून राग व्यक्त करत असतात. (Kolhapur News)
निवडणूक आयोगाला पैसे परत पाठवून देण्याची विनंती | Kolhapur News
मात्र, कोल्हापूर बाजार समितीच्या (Kolhapur Bajar Samiti Election) निवडणुकीत भलताच प्रकार समोर आला आहे. मतासाठी देण्यात आलेले हजार रुपये एका प्रामाणिक मतदाराने पाकिटात आहे तसेच घालून मतपेटीत टाकून दिले आहेत. ते पैसे कोणी दिले याचा उल्लेख न करता त्यांनी ते निवडणूक आयोगाला पैसे परत पाठवून देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मतांसाठी पैशाचा पाऊस पाडणाऱ्यांना एकप्रकारे चपराक दिली आहे. मतपेटीत एका स्वाभिमानी मतदाराने मतासाठी मिळालेले हजार रुपये तसेच मतपेटीत टाकले होते. पाकिट उघडले असता त्यामध्ये पाचशेच्या दोन नोटा आढळून आल्या.
कोल्हापूरमध्ये आज मतमोजणी करताना कर्मचाऱ्यांना एक पाकिट आढळून आले. यामध्ये पाचशेच्या दोन नोटा आढळल्या. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर चांगलीच चर्चा रंगली.
कोल्हापूरमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Kolhapur Bajar Samiti Election) निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणी दरम्यान कोल्हापूरकरांचा मूडच एकप्रकारे समोर आला आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवाराने वाटलेले पैसे एका मतदाराने चक्क मतपेटीतून निवडणूक आयोगाला परत केले आहे. मतमोजणीदरम्यान कर्मचाऱ्यांना मतपत्रिकेसोबत दोन पाचशेच्या नोटा आढळून आल्या. हे पैसे निवडणूक आयोगाला जमा करावे अशी विनंती या मतदाराने केली आहे.
उमेदवारांना चांगल्याच कानपिचक्या आणि सल्ले
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी चांगलीच रंगतदार होत चालली आहे. आधी एक मतपत्रिकोसोबत दोन पाचशेच्या नोटा आढळल्यानंतर आता काही मतपत्रिकांमध्ये चिठ्ठ्या सापडल्या आहेत. या चिठ्ठ्यांमधून मतदारांनी निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांना चांगल्याच कानपिचक्या आणि सल्ले दिले आहेत.
महाविकास आघाडीची विजयाकडे वाटचाल
दरम्यान कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. एकूण 18 पैकी 7 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये सत्ताधारी गटाने 5 पाच ठिकाणी विजय मिळवला आहे. एक जागा अपक्षाकडे गेली असून एका ठिकाणी विरोधी गटाने विजय मिळवला आहे. ग्रामपंचायत गटातून सुयोग वाडकर आणि शिवाजीराव पाटील विजयी झाले आहेत. अनुसूचित जातीमधून नानासो कांबळे विजयी झाले आहेत, तर आर्थिक दुर्बल पांडुरंग काशीद विजयी झाले आहेत. हमाल-तोलाईदार गटातून अपक्ष उमेदवार माजी संचालक बाबूराव शंकर खोत हे 60 मतांनी विजयी झाले आहेत. रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी सुरु आहे. सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी व शिव शाहू परिवर्तन शेतकरी विकास आघाडी या दोन आघाड्यात थेट लढत आहे.