मुंबई,दि.23: जगात सर्वात जास्त भटके कुत्रे भारतात आहेत. 36 टक्के लोकांचा मृत्यू रेबीजमुळे होत आहे. वाघ-बकरी चहा कंपनीचे मालक आणि व्यवस्थापकीय संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचा रविवारी ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. 15 ऑक्टोबला संध्याकाळी ते घरातून बाहेर चालण्यासाठी बाहेर पडले, याचवेळी त्यांच्यावर काही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. भटक्या कुत्र्यांपासून बचाव करताना त्यांचा तोल गेल आणि ते खाली पडले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. पराग देसाई यांच्या मृत्यूमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही वर्षात भटक्या कुत्र्यांचा हल्ल्याचं प्रमाण प्रचंड वाढलं असून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही लक्षणीय आहे.
हैदराबादमध्ये एका सोसायटीत 4 वर्षांच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या मुलीचे कुत्र्यांनी अक्षरश: लचके तोडले. उपचारासाठी मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण दुर्देवाने तिचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला संपूर्ण देश हळहळला. या घटनेने देशात दहशतीचं वातावरण तयार झालं.
36 टक्के लोकांचा मृत्यू हा रेबीजमुळे
एका अहवालानुसार जगात सर्वात जास्त भटके कुत्रे भारतात (India) आहेत. भारतात जवळपास 36 टक्के लोकांचा मृत्यू हा रेबीजमुळे होत असल्याचं धक्कादायक कारणही अहवालात नमुद करण्यात आलंय. हा टक्का यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. रेबीजच्या अनेक प्रकरणांची नोंदच होत नाही. एनिमल बर्थ कंट्रोल नियम 2001 नुसार भटक्या कुत्र्यांना मारता येत नाही, त्यांची केवळ नसबंदी केली जाऊ शकते. पण कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्याची चूक काय होती? भटक्या कुत्र्यांचा प्रश्न कसा सुटणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या राज्यात सर्वाधिक भटके कुत्रे
जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात जवळपास 3.5 कोटी भटके कुत्रे आहेत. तर 1 कोटीहून अधिक पाळिव कुत्रे आहेत. भारतात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यात सर्वाधिक भटके कुत्र्यांची संख्या नोंदवण्यात आली आहे. तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात कुत्रे चावण्याच्या सर्वाधिक घटना आहेत.
भारतात भटके कुत्रे सर्वाधिक असण्याचं मुख्य कारण म्हणजे भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याची घोषणा करण्यात आली, पण ही योजना प्रभावीपणे राबण्यात राज्य सरकारं कमी पडतायत. याशिवाय भारतात प्राण्यांच्या आरोग्यसेवा आणि नियंत्रणासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा नाहीए.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नसल्यामुळे ही संख्या कोटीच्या घरात गेली आहे.
भटक्या कुत्र्यांची आक्रमक वृत्ती असते. भटके कुत्रे अतिशय आक्रमक असतात आणि ते मनुष्य आणि इतर प्राण्यांवर हल्ला करतात. हे हल्ले जीवघेणेही असतात.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनुसार, 2019 मध्ये भारतात कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे 4,146 जणांचा मृत्यू झाला. यावरून या समस्येचे गांभीर्य लक्षात येईल.