‘जर आमच्या शांतता रॅलीत काही झाले तर त्याला…’ मनोज जरांगे पाटील

0

जालना,दि.6: मराठा समाजाची आजपासून शांतता रॅली सुरु होत आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मराठवाडा दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीतून आज सकाळी 7:15 वाजता रवाना झाले आहेत. मराठवाडा दौऱ्यावर जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. “आंदोलक म्हणून आशा बाळगणे माझे कर्तव्य असून आम्ही 13 तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासह अंतरवाली सराटीमधील सर्व गुन्हे मागे घेतील,” असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसंच राजकीय इच्छाशक्ती असेल तर 7 दिवस नाही, 2 तासांत कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाची एकजूट दाखविण्यासाठी ही रॅली काढण्यात येत आहे. पण या रॅलीत काही जण अशांतता माजविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांनी राज्यातील बड्या नेत्यावरच या रॅलीला गालबोट लावण्याचा आरोप केला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

“छगन भुजबळ त्यांच्या लोकांना सांगून, त्यांना पदांचे आमिष दाखवून आमच्या मराठा सामजाच्या शांतता रॅलीत काही करायला लावतील,” असा संशय जरांगे यांनी व्यक्त केलाय. जर आमच्या शांतता रॅलीत काही झाले तर त्याला छगन भुजबळ आणि सरकार जबाबदार राहील असं जरांगे म्हणाले. मोठ्या वाहनांचा ताफा घेऊन जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून मराठवाडा दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

हिंगोलीपासून मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला सुरुवात होत आहे..5 टप्यात ही जनजागृती रॅली वेगवेगळ्या जिल्ह्यात होणार आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि आरक्षणासाठी मराठा बांधवानी आतां बाहेर पडावे आणि यात शांततेच्या मार्गाने सहभागी होऊन आपली एकजूट दाखवून द्यावी अशी विंती जरांगे पाटील यांनी केली आहे. आपला एक दिवस करोडो मराठा बांधवाच्या मुलाचं भविष्य उज्वल करणारा आहे, असे आवाहन त्यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here