कोटा,दि.20: भाजपाच्या माजी आमदार आणि त्यांच्या समर्थकाला न्यायालयाने प्रत्येकी 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राजस्थानमधील कोटा येथील IFS अधिकारी रवि मीणा यांच्या कानशिलात लगावल्या प्रकरणी गुरुवारी कोर्टाने मोठा निकाल दिला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार भवानीसिंह राजावत आणि त्यांचे समर्थक भाजप कार्यकर्ते महावीर सुमन यांना न्यायालयाने प्रत्येकी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
मात्र, राजावत आणि सुमन यांना कोर्टाकडून लगेचच दिलासा मिळाला. दोघांनाही कोर्टातून जामीन मिळाला आहे. सरकारी वकिलांनी सांगितले की, SC/ST न्यायालयाने, त्यांना IPC कलम 353 (लोकसेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळ) यासह संबंधित कलमांखाली दोषी ठरवताना, प्रत्येक दोषीला 20,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
यावर माजी आमदार भवानी सिंह राजावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. SC/ST कायद्याच्या कलम 3 अंतर्गत आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.