सोलापूर,दि.८: राज्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज सोलापुरातून सत्ताधारी नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. ग्रामविकासमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजप आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका करताना रोहित पवारांनी बोचरे टोले लगावले आहेत.
पालकमंत्री जयकुमार गोरेंना चिमटा
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, “पालकमंत्री सर्व बैठका ‘बालाजी सरोवर’ हॉटेलमध्ये घेतात. ते सकाळ, दुपार, संध्याकाळ असे दिवसरात्र प्रचंड कष्ट करत आहेत. कष्ट जास्त झाले की माणूस गोळ्या खातो, मी फक्त एवढंच बोललो.” सोलापूर आणि अक्कलकोट भागातील पाणीटंचाईवर पालकमंत्र्यांनी कोणतेही ठोस नियोजन केले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
राजेंद्र राऊतांना प्रत्युत्तर: “पाचवीचा मुलगाही उत्तर देईल”
बारामती अॅग्रोने दारू उत्पादन बंद करून ते पाणी शेतकऱ्यांना द्यावे, अन्यथा बारामतीत धरणे आंदोलन करू, असा इशारा भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी दिला होता. यावर बोलताना रोहित पवारांनी राऊतांची खिल्ली उडवली. “ज्यांना कारखाने आणि डिस्टिलरी कसे चालतात याचे साधे ज्ञान नाही, त्यांना मी काय उत्तर देणार? त्यांच्या प्रश्नांना पाचवीत शिकणारा मुलगाही उत्तर देऊ शकतो. अशा लोकांना उत्तर देऊन मी माझा वेळ का वाया घालवू?” अशा शब्दांत त्यांनी राऊतांचा समाचार घेतला.
सरकारवर हल्लाबोल आणि प्रकल्पांवरून सवाल
या दौऱ्यादरम्यान रोहित पवारांनी राज्य सरकार आणि इतर नेत्यांवरही विविध मुद्द्यांवरून टीका केली:
दिवाळी शेतकऱ्यांसोबत: आम्ही संकटाच्या काळात घरी दिवाळी साजरी न करता कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत आहोत. उद्याचे गोकुळ दूध संघासंदर्भातील आंदोलन अधिक तीव्र होईल.
सरकारचा रडीचा डाव: निकाल विरोधात गेला तरी हे सरकार रडीचा डाव खेळत असून सर्व कारभार संविधानविरोधी सुरू आहे. गुलाबराव पाटील यांनी विचार करून बोलावे आणि मूळ विषयाला बगल देऊ नये.
रोहयो आणि गुंतवणूक: प्रकल्पांच्या नावाखाली दीड लाख कोटींची गुंतवणूक दाखवली जाते, पण प्रत्यक्षात फक्त ४०० नोकऱ्या मिळतात. एआय (AI) डेटा सेंटरसारखे प्रकल्प जास्त पाणी पितात आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण करतात. त्याऐवजी गुजरातप्रमाणे मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सोलापूर आणि महाराष्ट्राला द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
पक्षातील राजकारण: शरद पवार आजारी असल्याने काही लोक विचारपूस करण्यासाठी भेटले, मात्र त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न काहींनी केला. तसेच, अजित पवारांची दोन्ही परिवार एकत्र राहण्याची इच्छा होती; मात्र ‘दादा’ गेल्यानंतर अवघ्या १० दिवसांत सुनील तटकरे यांनी राजकारण सुरू केले, असा गंभीर आरोपही रोहित पवारांनी केला.








