सोलापूर,दि.७: सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पतीच्या खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवत पत्नी आणि तिच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रंजना दादासाहेब पवार (३२, रा. हिवरे, ता. मोहोळ) आणि अमोल ऊर्फ कृष्णा अंगद पांढरे (२३, रा. कोन्हेरी, ता. मोहोळ) अशी शिक्षा झालेल्या दोषींची नावे आहेत.
प्रकरणाची पार्श्वभूमी:
मयत दादासाहेब हणमंत पवार (३६, रा. हिवरे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) हा त्याची पत्नी रंजना पवार आणि अमोल पांढरे यांच्या अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी मिळून २६ एप्रिल २०२३ रोजी रात्री १० ते २८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९:१५ दरम्यान वडाची वाडी (ता. मोहोळ) येथील शेतात हत्याराने डोक्यात मारहाण करून दादासाहेब पवार याचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेह कॅनालच्या वाहत्या पाण्यात फेकून दिला होता.
या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल जिराज कासविद यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३०२, २०१ सह ३४ आणि १२० (ब) नुसार गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती.
तपास आणि पुरावे:
मयत दादासाहेब पवार याचा कुजलेला मृतदेह उजनी कॅनालच्या पाण्याचा उपसा करणाऱ्या पाईपजवळ अडकलेल्या अवस्थेत आढळला. डग्डू बागवाण यांनी याची माहिती पोलीस पाटलांना दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू करण्यात आला. मयताचे कपडे आणि हातातील गोफवरून मृतदेह दादासाहेब पवार यांचाच असल्याचे त्यांच्या काकांनी ओळखले.
तपासादरम्यान आरोपी अमोल पांढरे याने प्रेयसी रंजना हिच्या मदतीने मयताच्या अंगणात २६ एप्रिल २०२३ रोजी रात्री ११:३० वाजता झोपेत असताना लोखंडी पहारीने डोक्यात वार करून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पिकअप वाहन, पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज, डीएनए नमुने आणि इतर सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयाचा निकाल:
खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण २५ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. प्रदीपसिंह राजपूत, ॲड. माधुरी देशपांडे आणि ॲड. आनंद कुर्डेकर यांनी बाजू मांडली, तर आरोपींच्या वतीने ॲड. राज पाटील, ॲड. महेश सोलनकर आणि ॲड. स्नेहल राऊत यांनी काम पाहिले.
न्यायालयाने दोन्ही आरोपींना खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड (दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास) शिक्षा सुनावली.
पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ३ वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास) ठोठावला.
संगनमताने कट रचल्याच्या गुन्ह्यात सश्रम जन्मठेप आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंड (दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास) अशी शिक्षा सुनावली.








