सोलापूर,दि.६: सन २०२६ च्या खरीप हंगामात राज्यातील ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५,००० रुपये अग्रीम (आगाऊ) मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला २७ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती.
शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी द्यावयाच्या मदतीचे अंतिम स्वरूप ठरवण्यासाठी सध्या पीक वर्गवारी आणि क्षेत्रनिहाय तपशील निश्चित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्देशानुसार प्रत्येकी ५,००० रुपयांची ही तात्पुरती मदत दिली जात आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील एकूण ९ लाख ५२ हजार ५८ शेतकऱ्यांच्या याद्यांना ‘ई-पंचनामा’ पोर्टलवर मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५ लाख १७ हजार २८५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण २५८ कोटी ६४ हजार रुपये थेट वर्ग करण्यात आले आहेत. तसेच, उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही मदतीची रक्कम लवकरच जमा केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.








