सोलापूर,दि.४: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एक धक्कादायक हत्याकांड समोर आले असून, भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह करचे यांची डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
२७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास तिप्पेहळ्ळी परिसरात ही घटना घडली. प्रतापसिंह करचे हे आपल्या चारचाकी कारने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत गाडीत असलेल्या हर्षवर्धन ऐवळे आणि विक्रम घरडे या दोघांनी अचानक पिस्तुलातून करचे यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात करचे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत अवघ्या काही तासांत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हत्येत वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
शिंदे गटाच्या नेत्यांवर ‘सुपारी’ दिल्याचा आरोप
प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असली, तरी या हत्येमागे मोठा राजकीय कट असल्याचा दावा मृत प्रतापसिंह करचे यांच्या पत्नी अर्चना करचे यांनी केला आहे. त्यांनी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे (SP) लेखी तक्रार दाखल केली आहे.
आटपाडी येथील शिवसेना (शिंदे गट) नेते तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील, त्यांचे बंधू शिवाजी पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनी कट रचून सुपारी देत हा प्लॅन घडवून आणल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पुराव्यादाखल काही संशयित धमकीचे ऑडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
“आम्हाला न्याय हवा” – कुटुंबीयांची मागणी
“माझ्या घरातील कर्ता पुरुष गेला असून मला दोन लहान मुले आहेत. घटनेला दिवस उलटूनही मुख्य सूत्रधार मोकाट आहेत,” असा आरोप करत पीडित कुटुंबाने या प्रकरणात तात्काळ न्यायाची मागणी केली आहे. या हायप्रोफाइल प्रकरणाचा पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत.








