सोलापूर,दि.३: शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने त्यांच्या निर्बीजीकरणासोबतच अद्ययावत निवारा केंद्र उभारण्यावर भर दिला आहे. या प्रकल्पासाठी सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात ७ कोटी २० लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्याच्या प्रस्तावाला महापालिका स्थायी समितीने मान्यता दिली आहे. देगाव येथील ‘एसटीपी प्लांट’समोरील साडेचार एकर जागेवर १,००० कुत्र्यांच्या क्षमतेचे निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे.
स्थायी समितीची सभा सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत नागरिकांच्या दैनंदिन सुविधांशी संबंधित पाच महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.
प्रकल्पाची गरज आणि नियोजन
शहरात सध्या सुमारे ३५ हजार भटकी कुत्री असून, त्यांच्या निर्बीजीकरणाचा वेग वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या महापालिकेकडून दररोज सरासरी १८ कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या जातात. हा वेग वाढवण्यासाठी अधिक सक्षम आणि आधुनिक यंत्रणा उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
यासाठी ७ कोटी २० लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला होता. उपलब्ध निधीचे पुनर्विनियोजन करून सुधारित अंदाजपत्रकात निधी उपलब्धतेनुसार तरतूद करण्यास समितीने मंजुरी दिली. या निवारा केंद्राच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरीसाठी आता सर्वसाधारण सभेकडे पाठवण्यात येणार आहे.
असे असेल निवारा केंद्र
देगाव येथील ‘एसटीपी प्लांट’समोरील साडेचार एकर जागेवर हे निवारा केंद्र उभारले जाईल. यामध्ये प्रत्येकी १० कुत्र्यांची क्षमता असलेले १०० केज (Cages) तयार करण्याचे नियोजन असून, एकाच वेळी सुमारे १,००० कुत्र्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था येथे होऊ शकेल.
प्रकल्प अहवालानुसार, या निवारा केंद्राच्या विविध कामांसाठी सुमारे ८ कोटी १४ लाख ८३ हजार ५७० रुपये खर्च अपेक्षित आहे. जीएसटीसह (GST) हा एकूण खर्च ९ कोटी ९९ लाख ९६ हजार ६३८ रुपयांपर्यंत जाणार आहे.
मनुष्यबळ वाढवण्याची सूचना
भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि व्यवस्थापन विभागात सध्या २ डॉक्टर आणि ४ मदतनिसांसह केवळ ८ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध आहे. मात्र, मंजूर आकृतिबंधानुसार या विभागासाठी सुमारे ६० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे तातडीने कर्मचारी संख्या वाढवण्याची सूचना स्थायी समितीने केली आहे.
प्रकल्पाचा अपेक्षित खर्च
१,००० कुत्र्यांसाठी डॉग शेल्टर: ₹३.१२ कोटी
एबीसी (ABC) सेंटर: ₹२.५० लाख
ऑपरेशन थिएटर: ₹५६.५१ लाख
साइट डेव्हलपमेंट: ₹१.२१ कोटी
इलेक्ट्रिकल कामे: ₹६१ लाख
अग्निशमन यंत्रणा: ₹२० लाख
एकूण मूळ खर्च: ₹८ कोटी १४ लाख ८३ हजार ५७०
जीएसटीसह एकूण खर्च: ₹९ कोटी ९९ लाख ९६ हजार ६३८
स्थायी समितीच्या सभेत मंजूर झालेले अन्य विषय
प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना खाद्यपुरवठा:
महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना चिकन, म्हैसवर्गीय बीफ आणि अंडी पुरवण्यासाठी ‘मे. उन्नती कन्स्ट्रक्शन’ यांना मंजूर दराने दिलेल्या वर्कऑर्डरची माहिती समितीने घेतली. त्यानुसार चिकनसाठी ₹२४० प्रति किलो, बीफसाठी ₹२३० प्रति किलो आणि अंड्यांसाठी ₹५ प्रति नग असा दर निश्चित करण्यात आला आहे.
पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी ४ मक्तेदार:
विभागीय कार्यालय क्रमांक १ ते ८ आणि मुख्य कार्यालयांतर्गत पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी (सन २०२६-२७) ४ मक्तेदारांचा वार्षिक मक्ता निश्चित करण्यात आला. यामध्ये डीआय (DI) आणि एमएस (MS) पाइपलाइनची दुरुस्ती, विशेष दुरुस्ती तसेच स्लुईस व्हॉल्व्ह पुरवणे व बसवणे या कामांचा समावेश आहे. यासाठी सुमारे ४ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
कब्रस्तानातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व किरकोळ दुरुस्ती:
प्रभाग क्रमांक २२ मधील जन्नतुल फिरदोस कब्रस्तान परिसरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी देण्यात आलेल्या वर्कऑर्डरची माहिती समितीने नोंदवून घेतली. तसेच, विभागीय कार्यालय क्रमांक ६ अंतर्गत दैनंदिन देखभाल व किरकोळ दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी श्रीकांत सिद्राम भोळे यांची मंजूर निविदा दराने मक्तेदार म्हणून नियुक्ती करून वर्कऑर्डर देण्यास मंजुरी देण्यात आली.








