सोलापूर,दि.१: पुण्यातील एका कुख्यात गुंडाला पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी, आरोपीची पत्नी नफिसा फरीद शेख (रा. पुणे) हिस सोलापूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
घटनेची पार्श्वभूमी
पुणे शहर गुन्हे शाखेचे युनिट-६ आणि युनिट-५ चे अधिकारी-कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशानुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या संशयितांचा शोध घेत होते. काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी आणि ‘मकोका’च्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला कुख्यात आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय २३, रा. हडपसर, पुणे) हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार, १४ जून २०२५ रोजी पुणे पोलिसांचे पथक मोहोळ पोलिसांच्या मदतीने संशयिताचा शोध घेत असताना, तो लांबोटी गावातील एका दुमजली इमारतीत राहत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांवर गोळीबार आणि अडथळा
दिनांक १५ जून २०२५ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सदर इमारतीतील खोलीचा दरवाजा ठोठावला. आतमध्ये शाहरुखची पत्नी आणि दोन मुले होती. पोलिसांनी कारवाईची माहिती देताच आरोपीच्या पत्नीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख याने हातात पिस्तूल घेऊन पोलिसांच्या दिशेने रोखले आणि आरडाओरडा केला. पोलिसांनी त्यास आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले असता, त्याची पत्नी “तुम मेरे शोहर को नहीं पकड़ सकते” असे म्हणत पोलिसांच्या अंगावर धावून आली. तिने धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला, जेणेकरून आरोपी पळून जाऊ शकेल.
यानंतर शाहरुखने पोलिसांच्या दिशेने जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनीही प्रत्युत्तर दाखल केले, ज्यामध्ये शाहरुख जखमी झाला. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाचा निर्णय
या गुन्ह्यात नफिसा फरीद शेख हिच्यावर पतीला पळून जाण्यास मदत केल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप होता. या प्रकरणी तिने सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वकील अभिजीत इटकर यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
न्यायालयाने आरोपींतर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून नफिसा फरीद शेख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. सरफराज शेख, ॲड. फैयाज शेख, ॲड. सुमित लवटे आणि ॲड. तुषार सिरसट यांनी काम पाहिले.








