Home राजकारण सोलापुरात काँग्रेसविरोधात भाजपचा ‘एल्गार’! भव्य पदयात्रेतून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

सोलापुरात काँग्रेसविरोधात भाजपचा ‘एल्गार’! भव्य पदयात्रेतून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

0
Screenshot

सोलापूर,दि.५:  काँग्रेस पक्ष आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी सोलापूर शहर भाजपच्या वतीने बुधवारी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या या पदयात्रेत पालकमंत्री जयकुमार गोरे, महापौरांसह भाजपचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  

यावेळी “काँग्रेस देशात अराजकता निर्माण करत असून घुसखोरांना वाचवण्याचे काम करत आहे,” असा गंभीर आरोप पालकमंत्री गोरे यांनी केला.  

पदयात्रेची हायलाइट्स: ‘मोदी कहीं नहीं जाएंगे’चे बॅनर अन् देशभक्तीचा जोश

 रथावरून देशभक्तीपर गाणी: छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सायंकाळी ६ वाजता या पदयात्रेचा प्रारंभ झाला. पदयात्रेच्या अग्रभागी असलेल्या रथावर देशभक्तीपर गाणी वाजवण्यात येत होती.  

 हातात तिरंगा अन् भाजपचे झेंडे: हातात देशप्रेमाचा तिरंगा आणि पक्षाचे झेंडे घेऊन हजारो कार्यकर्ते या मोर्च्यात सहभागी झाले होते.  

 लक्षवेधी घोषणाबाजी: नगरसेवकांनी हातात विविध घोषणांचे फलक धरले होते. ‘मोदी कहीं नहीं जाएंगे‘, ‘CAA हे केवळ एकनिमित्त आहे, घुसखोरांना वाचवणे हाच काँग्रेसचा खरा हेतू‘, ‘एक नागरिक, एक ओळख – भारताचे मतदान, भारताचा अभिमान‘अशा आक्रमक घोषणांनी संपूर्ण सोलापूर शहर दुमदुमून गेले.  

गौतम चौकात जाहीर सभा: बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती मार्गे ही पदयात्रा ‘गौतम चौक’ येथे पोहोचली, जिथे सभेच्या माध्यमातून पदयात्रेची सांगता झाली. सभेचे प्रास्ताविक शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी केले.  

“EVM वर शंका घेणाऱ्यांनी पाप करू नये” – पालकमंत्री जयकुमार गोरे

काँग्रेसच्या ईव्हीएम (EVM) विरोधातील भूमिकेवर बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “काँग्रेसचे खासदार EVM वर शंका उपस्थित करत आहेत, पण त्याच EVM च्या माध्यमातून ते तीन वेळा आमदार आणि एकदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा EVM चांगले आणि हरल्यावर अचानक वाईट कसे होते? दिल्लीतील नेत्यांच्या सांगण्यावरून EVM वर शंका घेणे बंद करा, असा प्रकार करून पाप करू नका.”

तसेच काँग्रेस नेत्यांच्या प्रशासकीय ज्ञानावर टीका करताना ते म्हणाले, “जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा केली असता काँग्रेस नेत्यांना Special Review (SR) किंवा BLA काय आहे, हेच माहिती नाही. हे नेते केवळ दिल्लीत जंतर-मंतरवर ‘हलगीनाद’ करत वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत आहेत.”  

दिग्गज नेत्यांची उपस्थिती

या पदयात्रेला ग्रामीण भागातूनही भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या कार्यक्रमात आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे, नरसिंग म्हेजी, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मनीष देशमुख, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  

या पदयात्रेत आमदार विजयकुमार देशमुख काही वेळ सहभागी झाले होते, मात्र ते मुख्य व्यासपीठावर उपस्थित नव्हते, अशीही चर्चाराजकीय वर्तुळात रंगली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.