BRSचे खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर जीवघेणा हल्ला

0

मुंबई,दि.३०: BRSचे खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. भारत राष्ट्र समितीचे ( पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती ) खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करताना रेड्डी यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. यात रेड्डी हे गंभीर जखमी झाले आहेत. रेड्डींना सिकंदराबाद येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांना भाजपाचे विद्यमान आमदार रघुनंदन यांच्याविरोधात दुब्बका मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आज ( ३० ऑक्टोबर ) सिद्धीपेठ येथे प्रचार करताना एक अनोळखी व्यक्ती रेड्डी यांच्याजवळ आली. तेव्हा रेड्डींना ही व्यक्ती हस्तांदोलन करत आहे, असं वाटलं. पण, अचानक या व्यक्तीनं चाकू बाहेर काढला आणि पोटात खुपसला.

या हल्ल्यात रेड्डी गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर भारत राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी अनोळखी व्यक्तीला पकडून चोप दिला. याबद्दल सिद्धीपेठ पोलीस आयुक्त एन. स्वेथा म्हणाल्या की, “हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे.”

दरम्यान, खासदार रेड्डी यांना सिकंदराबादमधील यशोदा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्याची माहिती मिळताच भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांनी रेड्डी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत प्रकृतीची माहिती घेतली. मंत्री टी. हरीश राव यांनीही रेड्डी यांच्याशी चर्चा केली आहे. राव यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here