पोलीसावर हल्लाप्रकरण माजी सैनिकास जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.२८: पोलीसावर हल्ला करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी सैनिकास जामीन मंजूर करण्यात आला आहे. यात हकिकत अशी की, सोलापूर येथील रहिवासी माजी सैनिक सिध्दप्पा सायबण्णा हिपळे यांनी दि. २६/०८/२०२३ रोजी औदयोगिक वसाहत पोलीस चौकी येथे जावून कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

त्यानंतर या माजी सैनिकाने मी निवृत्त सैनिक आहे असे सांगून तेथील पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करुन गच्ची पकडून धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणला. अशा आशयाची फिर्याद विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली. सदर प्रकरणी सिध्दप्पा सायबण्णा हिपळे यास दिनांक २६/०८/२०२३ रोजी अटक करून कोर्टात हजर केले असता, कोर्टाने आरोपीला २७/०८/२०२३ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सदर आरोपीने जामीनासाठी ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयात जामीनाचा अर्ज दाखल केला.

पोलीसावर हल्लाप्रकरण माजी सैनिकास जामीन मंजूर

यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर आरोपी हा माजी सैनिक असून त्याचा वाद नेमका कुठल्या कारणामुळे झालेला आहे याची तपशीलवार माहिती फिर्यादीमध्ये दिलेली नाही. तसेच आरोपीचा सरकारी कामात अडथळा आणण्याचा कुठलाही उद्देश सदर घटनेचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर दिसून येत नाही. त्यामुळे ज्या काही घटनेसंबंधी महत्वाच्या बाबी आहेत त्या मुद्दामहून लपवून ठेवल्याचे निदर्शनास येते. सदर युक्तीवादाच्या वेळेस आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले.

सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी सदर आरोपी सिध्दप्पा सायबण्णा हिपळे याची जामीनावर मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. संतोष आवळे, ॲड. फैयाज शेख, ॲड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here