नवी दिल्ली,दि.५: डीएमके खासदार सेंथिल कुमार यांनी संसदेत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले आहे. आज दुसऱ्या दिवशी गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीर आरक्षण संशोधन विधेयक लोकसभेत मांडले. यावेळी चर्चेदरम्यान धर्मपुरीचे डीएमके खासदार डॉ. सेंथिल कुमार यांनी भाजपावर टीका करताना त्यांची ताकद केवळ आम्ही गोमुत्र राज्ये म्हणतो त्याच हिंदी राज्यांत आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
भाजपाला दक्षिणेतील राज्यांत घुसायलाही दिलेले नाहीय. काश्मीरप्रमाणे भाजपा दक्षिण भारतातील राज्यांना देखील केंद्र शासित प्रदेश बनविण्याचा धोका आहे. कारण ते तिथे जिंकू शकत नाहीत, परंतू ही राज्ये केंद्राच्या ताब्यात घेऊन राज्यपालांमार्फत शासन करू शकतात, असा आरोप सेंथिल यांनी केला.
सेंथिल यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने हात झटकले आहेत. हे संसदेतील एखाद्या व्यक्तीचे वैयक्तीक वक्तव्य आहे, त्याचा आमच्याशी काही संबंध नाही. आम्ही गाईला मानतो, असे काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे.
हा सनातन परंपरेचा अपमान आहे. डीएमकेला लवकरच गोमुत्राच्या फायद्याची माहिती होईल. देशाची जनता हे सहन करणार नाही, असे केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी म्हटले आहे. नवल किशोर यादव यांनी हिंदी भाषिक राज्यांना शिव्या देणाऱ्या लोकांवर मानसिक उपचार करण्याची गरज आहे. येत्या निवडणुकीत त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात येईल, असे म्हणाले आहेत.