सोलापूर,दि.१९: देवगड अल्फोन्सो (हापूस) आंब्याच्या नावाने बाजारात होणारी तोतयागिरी आणि बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी ‘हापूस (अल्फोन्सो)’ च्या भौगोलिक संकेत (जीआय) टॅगची रजिस्टर्ड प्रोप्रायटर असलेल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने या वर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर ‘टँपर प्रूफ युआयडी सील’ (TP Seal UID) सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता प्रत्येक अस्सल देवगड हापूस आंब्यावर हा खास ‘टँपर प्रूफ युआयडी सील’ स्टिकर लावणे बंधनकारक असेल आणि असे युआयडी असलेले आंबेच ‘देवगड हापूस’ किंवा ‘देवगड अल्फोन्सो’ म्हणून विक्री किंवा विपणन करता येणार आहे.
या उपक्रमामुळे देवगड हापूसच्या नावाखाली सर्रास होणारी बनावट आंब्यांची विक्री पूर्णतः बंद होतील आणि ग्राहकांना केवळ जीआय प्रमाणित, अस्सल देवगड हापूस आंबेच मिळतील असा संस्थेचा विश्वास आहे.
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादितचे संचालक सदस्य अॅड. ओंकार एम. सप्रे म्हणाले, देवगड तालुक्यातील हापूस आंबा गेल्या शतकाहून अधिक काळ आपल्या विशिष्ट सुगंध व चवीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याला बाजारात मोठी मागणी आहे. मात्र, सध्या देवगड हापूसच्या नावाखाली विक्री होणारे ८० टक्क्यांपेक्षा जास्त आंबे हे वास्तविक देवगडमधील नाहीत. गेल्या तीन दशकांपासून इतर भागांतील निकृष्ट दर्जाचे आंबे सर्रास देवगड हापूस म्हणून विकले जात आहेत. त्यामुळे देवगडमधील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, त्याचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम देखील होत आहेत. त्यामुळेच ‘हापूस (अल्फोन्सो)’ च्या जीआय टॅगची रजिस्टर्ड प्रोप्रायटर या नात्याने प्राप्त होणाऱ्या अधिकारांचा वापर करून संस्थेने ‘टँपर प्रूफ युआयडी सील’ सक्तीचे करण्याचा हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.” या प्रकल्पाकरिता ‘टँपर प्रूफ युआयडी सील’ चे पेटंट असलेल्या संस्थेने मुंबई स्थित सन सोल्यूशन्स संस्थेबरोबर करार केला आहे.
कशी काम करते टँपर प्रूफ युआयडी सील’ स्टिकर प्रणाली?
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्याकडील झाडांची संख्या व त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार ‘टँपर प्रूफ युआयडी सील’ वितरित केले आहेत. शेतकऱ्यांनी बाजारात पाठवलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हा युआयडी स्टिकर लावणे बंधनकारक असेल.
प्रत्येक स्टीकर दोन भागात विभागलेला एक स्वतंत्र युआयडी असतो. त्या कोड चा एक भाग स्टीकर च्या वरती आणि दूसरा भाग स्टीकर च्या खाली असतो. आपल्याकडील आंबा देवगड चाच आहे का हे तपासण्यासाठी ग्राहकांनी +९१ ९१६७ ६६८८९९ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून फोटो पाठवायचा आहे. ही सिस्टम (प्रणाली) त्या स्टीकर वरील कोड वाचते आणि स्टीकर च्या मागील नंबर लिहून पाठवण्यास सांगते. नंबर वाचण्यासाठी स्टीकर काढले असता त्याचे आपोआप दोन भाग होतात.
जर व्हॉट्सअॅप द्वारे आलेला संपूर्ण कोड सिस्टममधील युआयडीशी जुळला, तर ग्राहकास शेतकरी/विक्रेत्याचे नाव, मूळ गाव, जीआय नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील पाठवला जाईल.
या पडताळणी प्रक्रियेमुळे ‘देवगड हापूस’ बाबतची विश्वसनीयता वाढेल आणि देवगड हापूसच्या जागतिक कीर्तीचे रक्षण करण्यास मदत होईल. तोतयागिरी करणाऱ्या आणि देवगड हापूस च्या नावाखाली बनावट आंब्यांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.