मुंबई,दि.१९: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातील हिंदू संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी केली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आदी संघटनांनी निदर्शने केली. नागपूर येथे औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल सारख्या हिंदू संघटना सतत कबर हटवण्याची मागणी करत आहेत. सोमवारी सकाळी नागपुरात त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ मोठे निदर्शने करण्यात आली. निषेधादरम्यान, काही संघटनांनी औरंगजेबाची ‘कबर’ प्रतीकात्मकपणे जाळली. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात काही पोलिसही जखमी झाले.
विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ४६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
ते औरंगजेबाला आगामी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा बनवत आहेत. औरंगजेबाची कबर ही पुढची अयोध्या आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपा-आरएसएस औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहेत, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच अयोध्याचा आता राजकीय फायदा नाही. औरंगजेबाची मजार यामध्ये राजकीय लाभ आहे, त्यामुळे ही दुसरी अयोध्या होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र पेटत ठेवणे हा त्याच्यातील कारभार राहणार, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
नागपूरसह राज्यभरातील लोकांना माझे आवाहन आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता कायम ठेवा. महाराष्ट्र सरकारमधील एक विषारी मंत्री दररोज समाजात द्वेष पसरवण्याचं आणि विभाजन करण्याचं काम करत आहे. महाराष्ट्रात दोन समाजात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरूनही लोक आणले जात आहे. हा एका मोठ्या कटाचा भाग आहे. अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती.