पटना,दि. 18: Bihar Crime: बिहारची राजधानी पटना येथे अवैध खाणकाम विरोधात छापा टाकण्यासाठी बिहटा येथे पोहोचलेल्या टीमवर काही लोकांनी हल्ला केला. या घटनेत जिल्हा खनन अधिकारी व अन्य दोघे जखमी झाले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, महिला अधिकाऱ्यालाही आरोपींनी फरफटत नेले. यावेळी सहकारी अधिकारी तिला वाचवताना दिसत आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात समाजकंटक अधिकाऱ्यांवर बेदम लाठीचार्ज करताना दिसत आहेत. याशिवाय अनेक लोक दगडफेक करत आहेत. अधिकाऱ्यांची टीम जीव वाचवून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र लोकांनी संपूर्ण टीमला चारही बाजूंनी घेरले आहे. यादरम्यान अधिकारी टीममध्ये सहभागी असलेल्या महिला अधिकाऱ्यांचाही बचाव करत आहेत. मात्र हल्लेखोर थांबत नाहीत. ते सातत्याने अधिकाऱ्यांवर हल्ले करत आहेत.
माहितीनुसार, अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एमव्हीआय, ईएसआयसह वाहतूक आणि खाण विभागाच्या पथकाकडून छापा मोहीम राबवली जात होती. पहाटे 3.45 च्या सुमारास छापा टाकणाऱ्या पथकावर कोयलवार पुलाखालील बंद पेट्रोल पंपावर समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी दानापूर यांना पटनाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाठवले. दगडफेक करणाऱ्यांवर सखोल छापे टाकण्यात येत आहेत. पोलिसांनी 44 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. जवळपास 50 वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. वाहनधारक व चालकांवर एफआयआर नोंदविण्याची कारवाई सुरू आहे.
मीडियाशी बोलताना सिटी एसपी पश्चिम पटना म्हणाले की, घटनास्थळावरून एक काळी स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे ज्यामध्ये वायरलेस सेट बसवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक, पश्चिम, उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दानापूर बिहटा येथील आरोपींविरुद्धच्या छापेमारीच्या कारवाईवर लक्ष ठेवून आहेत.
पटनाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधाराला पोलीस लवकरच जेरबंद करतील.