मुंबई,दि.२९: Assam Congress: भगवान श्रीकृष्णांबाबत काँग्रेस नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा हे एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी तसेच धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे विवाह म्हणजे लव्ह जिहाद असल्याची मुक्ताफळे बोरा यांनी उधळली होती. त्यानंतर वाद वाढल्यावर त्यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. आसाममधील गोलाघाट येथे झालेल्या एका तिहेरी हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना भूपेन बोरा यांनी हे विधान केलं होतं. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी एफआयआर दाखल करून अटक करण्याचा इशारा बोरा यांना दिला होता. (Assam Congress)
सोमवारी गोलाघाट जिल्हात एका २५ वर्षीय युवकाने कौटुंबिक वादातून पत्नी आणि तिच्या आई-वडिलांची हत्या केली होती. त्यानंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं. हत्या करणारा पती हा मुस्लिम आणि पत्नी ही हिंदू असल्याने या घटनेनंतर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे म्हटले होते.
भगवान श्रीकृष्णांबाबत काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य | Assam Congress
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर टीका करताना काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष बोरा यांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, प्रेम आणि युद्धामध्ये सारं काही माफ असतं. आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. त्यात कृष्णाचं रुक्मिणीसोबत पळून जाणं समाविष्ट आहे. महाभारत घडण्याचं मुळ काय आहे. गांधारीच्या कुटुंबीयांना तिचा धृतराष्ट्रासोबत विवाह करायचा नव्हता. भीष्म पितामहांनी त्यांचा जबरदस्तीने विवाह लावून दिला. मामा शकुनींचा भाऊ तुरुंगात होते. नंतर त्याने कौरवांचा बदला घेतला. तोसुद्धा लव्ह जिहादच आहे. मुख्यमंत्र्यांनी आजच्या काळात विविध धर्म आणि समुदायातील लोकांमध्ये होणाऱ्या विवाहांचा राग आळवता कामा नये, असा सल्ला बोरा यांनी दिला.
मात्र बोरा यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच कुणी पोलिसांमध्ये तक्रार केली तर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येईल, असा इशारा दिला होता. कुणीही धार्मिक भावना दुखावता कामा नये. कुणी काय म्हटलंय हे मला माहिती नाही. मात्र धार्मिक भावनांशी खेळ करता कामा नये. मात्र भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला या वादात ओढणं खूप निंदनीय आहे. हे सनातन धर्माविरोधात आहे, असे सरमा यांनी सुनावले.