मुंबई,दि.30: Andhra Pradesh Train Accident: आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन प्रवासी ट्रेन्सची धडक झाली. या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 54 जण या अपघातात जखमी झाले आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम्-रायगड पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विशाखापट्टणम्-पलासा पॅसेंजर एक्सप्रेसला मागून धडक दिली. या अपघातामध्ये रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरुन उतरले. ही धडक कंटाकापल्ले आणि अलमांडा रेल्वे स्टेशनदरम्यान हा अपघात झाला.
विजयानगरम जिल्ह्यातील हावडा-चेन्नई मार्गावर एका ट्रेनने सिग्नल ओलांडल्यानंतर आणि दुसऱ्या ट्रेनला धडकल्यानंतर अनेक डबे रुळावरून घसरले. हा अपघात संध्याकाळी ७ च्या सुमारास झाला, तिथे ०८५३२ विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन आणि ०८५०४ विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल यांच्यात धडक झाली. ईस्ट कोस्ट रेल्वेने सांगितले की, आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात दोन गाड्यांची टक्कर मानवी चुकांमुळे झाली असावी. मुख्य जनसंपर्क अधिकारी विश्वजीत साहू म्हणाले, “विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल ट्रेनने सिग्नलचे ‘ओव्हरशूटिंग’ केले होते. त्यामुळे दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्या.
अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, जेव्हा एखादी ट्रेन रेड सिग्नलवर थांबण्याऐवजी पुढे जाते तेव्हा असे घडते. अपघातामुळे विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनचे (ट्रेन क्रमांक ०८५३२) मागील दोन डबे आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजरचे लोको कोच (ट्रेन क्रमांक ०८५०४) रुळावरून घसरले.
मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी तातडीने मदत उपाययोजना करण्याचे आणि विशाखापट्टणम आणि विजयनगरमच्या जवळच्या जिल्ह्यांमधून शक्य तितक्या रुग्णवाहिका पाठवण्याचे आदेश दिले आहेत. जखमींना उपचार मिळावेत यासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना आरोग्य, पोलिस आणि महसूल यासह अन्य सरकारी विभागांशी समन्वय साधून तातडीने मदत उपाययोजना करण्याचे आदेश दिले आणि जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा मिळतील याची खात्री केली.
या अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाने काही हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. बीएसएनएल क्रमांक ०८९१२७४६३३० ०८९१२७४४६१९ एअरटेल सिम ८१०६०५३०५१ ८१०६०५३०५२ बीएसएनएल सिम ८५००४१६७० ८५००४१६७१. या अपघात आंध्रप्रेदशातील मृतांना १० लाखांची मदत आणि इतर राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत. तर गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.