नवी दिल्ली,दि.२१: कोरोनाचा सबव्हेरिएंट JN.1 च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लोकांना आवाहन करण्यात आले आहे. दक्षिणेतील अनेक राज्यासह देशात कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारकडून बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्यासह विविध राज्यांतील आरोग्य मंत्री, उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. यात चाचण्या वाढवणे, आरोग्य यंत्रणा मजबूत करणे यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे, घाबरण्याची नाही असं या बैठकीत आरोग्य मंत्री मांडविया यांनी म्हटलं.
केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, चीन, ब्राझील, जर्मनी आणि अमेरिकेतील कोविड रुग्णात झालेली वाढ पाहता आपल्याही कोविडच्या नव्या व्हेरिएंटशी लढण्यासाठी तयार राहावे लागेल. सणांचे दिवस पाहता सतर्कता आवश्यक आहे. कोविड अद्याप संपलेला नाही. देखरेख ठेवा. केंद्राकडून राज्यांना पूर्ण मदत केली जाईल. राज्यांनी कोविड चाचण्या वेगाने कराव्यात. कोविड पॉझिटिव्ह आणि निमोनियासारख्या आजारांचे जास्तीत जास्त नमुने दररोज INSACOG तपासणीसाठी पाठवा जेणेकरून जीनोम सिक्वेसिंगमधून नव्या व्हेरिएंटचा शोध घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं.
तसेच रुग्णालयाच्या तयारीसाठी ‘मॉक ड्रील’ करणे, निगराणी वाढवणे आणि लोकांशी बोलणे आवश्यक आहे. दर तीन महिन्यांनी सर्व रुग्णालयांमध्ये ‘मॉक ड्रिल’ करण्याची गरज आहे असंही आरोग्य मंत्र्यांनी सूचना केल्या. तर जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोविडचे सक्रिय रुग्ण खूपच कमी आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी बैठकीत दिली.
सौम्य आजाराचे लक्षण
नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले की, सध्या देशात कोविड सब-व्हेरियंट JN.1 चे २१ प्रकरणे आहेत. देशात कोविडचे २३११ सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी ५१९ प्रकरणे नोंदवली गेली. नवीन व्हेरिएंटबद्दल घाबरण्याची गरज नाही, कारण हा व्हेरिएंट अधिक संक्रमक असला तरी आजार सौम्य आहे. सर्दी-खोकला होतो.मागील दोन आठवड्यात १६ लोकांचा मृत्यू झाला आहे, परंतु या लोकांना आधीच इतर अनेक गंभीर आजार होते. काहींना हृदयविकार तर काहींना कर्करोग झाला होता. कोविड त्याचे रुप बदलतो. देशाला सतर्क राहावे लागेल असं त्यांनी म्हटलं.
नव्या व्हेरिएंटचे आतापर्यंत २१ रुग्णे
आतापर्यंत देशात कोविड JN.1 च्या नवीन सब व्हेरिएंटचे २१ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १८ गोव्यातील आहेत. या व्हेरिएंटबाबत आणखी सखोल तपास सुरू आहे. परंतु सध्या चिंतेचे कारण नाही. या व्हेरिएंटचे रुग्ण कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बरे झाले आहेत. भारतातील वैज्ञानिक या नवीन व्हेरिएंटचा तपास करत आहेत. ICMR या व्हेरिएंटच्या जीनोम चाचणीवर काम करत आहे. सूत्रांनुसार,हा व्हेरिएंट कोविडच्या वाढत्या प्रकरणांचे कारण आहे. अधिक जीनोम चाचणी केली जात असल्याने, या व्हेरिएंटची रुग्णसंख्या वाढेल. आता दिलासादायक बाब म्हणजे, लक्षणे सौम्य आहेत आणि रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमी होत आहे. ८ डिसेंबर रोजी केरळमध्ये त्याचा पहिला रुग्ण सापडले. ७९ वर्षीय महिलेच्या RT-PCR चाचणीत आढळून आला. ती देखील आता बरी झाली आहे.