सोलापूर,दि.21: महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकाची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. सोलापूर येथील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अधिकारी, महेंद्र मल्लीशा माने यांनी फिर्यादीची दिव्यांग बहीण यांच्या नावे मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणाची रक्कम रु. 5,00,000/- तिच्या बँक खात्यात वर्ग करण्यासाठी फिर्यादीकडे रक्कम रु. 20,000/- ची लाचेची मागणी केल्याबाबत फिर्यादीने महेंद्र माने जिल्हा व्यवस्थापक व लिपिक यांच्याविरुद्ध सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केलेली होती.
सदरच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागामार्फत करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये आरोपी महेंद्र माने यांनी फिर्यादीकडे कर्जाची रक्कम रु. 5,00,000/- बँकेत जमा करण्यासाठी तडजोडीअंती रक्कम रुपये 15,000/- मागणी करून सदरची लाचेची रक्कम त्यांच्या कार्यालयातील लिपिक बनसोडे यांच्याकडे देण्याबाबत सांगितल्याचे निष्पन्न झालेले होते. त्यानुसार सदरची लाचेची रक्कम रु. 15,000/- तक्रारदाराकडून स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडून अटक करण्यात आलेली होती.
त्यानुसार आरोपींच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर प्रकरणात आरोपी महेंद्र माने यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी यांनी जामीनाच्यावेळी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी आरोपी महेंद्र माने यांची रक्कम रुपये 50,000/- च्या जामिनावर मुक्तता केली.
यात आरोपीच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. राणी गाजूल, ॲड. ओंकार परदेशी यांनी काम पाहिले.