छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि संदिपान भुमरेंमध्ये जोरदार राडा

0

छत्रपती संभाजीनगर,दि.7: छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि संदिपान भुमरेंमध्ये जोरदार राडा झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून मोठी राजकीय बातमी येत असून, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा पाहायला मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत (Uday Singh Rajput) यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचं मुद्दा उपस्थित केला.

यावरुन मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केल्याने शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आमदार राजपूत यांच्या मदतीला धावून आले आणि मंत्री भुमरे आणि सत्तार यांना सुनावले. यावरुन थेट हमरीतुमरी सुरु झाली आणि हा वाद थेट एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आले.

“कोणताही अन्याय सहन करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जिल्हा नियोजन मंडळ स्वतःची जहागिरी आहे अशा पद्धतीने पालकमंत्री वागत असतील तर त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. ही माझी एकट्याची नाही सत्ताधारी लोकांचीही हीच भूमिका होती. लोकसंख्येच्या निकषानुसार निधी वाटप होते,” असे अंबादास दानवे म्हणाले.

“सगळ्या तालुक्याला सारखा निधी दिला. विरोधी पक्षाचे कामच ते आहे. विरोधी पक्षाने आवाज नाही वाढवलं तर त्यांना विरोधी पक्षनेता कोण बनवेल,” असे संदिपान भुमरे म्हणाले.

अंबादास दानवे आणि संदिपान भुमरेंमध्ये जोरदार राडा

मागील काही दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटातील वाद आणखीच वाढताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता हाच वाद औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाहायला मिळाला. कारण यावेळी शिंदे गटाचे मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार यांच्यात राडा पाहायला मिळाला. निधी वाटपावरुन ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी जिल्हा नियोजन समितीत प्रश्न उपस्थित करत आमच्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थितीत केला. यावरुन पालकमंत्री संदीपान भुमरे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजपूत यांना उत्तर दिले. यावेळी राजपूत यांच्या मदतीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे धावून आले आणि वाद सुरु झाला. यावेळी दानवे आणि भुमरे यांच्या चांगलाच वाद झाला. या वादच एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन बैठकीत झालेल्या वादावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिकिया समोर आली आहे. “ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. याची पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दखल घेत याबाबत जिल्हाधिकारी यांना सांगून आपल्याला लेखी कळवण्यात येईल असे म्हटले. मात्र, त्यानंतर देखील आमदार राजपूत यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, पालकमंत्री यांनी त्यांना कडक शब्दात सूचना केल्या. त्यानंतर बैठक सुरळीत झाली.” तर कोणेही कोणाच्या अंगावर धावून गेले नाहीत, असा दावा देखील शिरसाट यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here