छत्रपती संभाजीनगर,दि.27: हनुमानासारखी माझी छाती फाडून दाखवली तर त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटीलच दिसतील असे वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. याबाबत शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारले असता विखे पाटील मुख्यमंत्री काय त्यापेक्षा मोठे नेते व्हावेत असं मला वाटत असल्याची प्रतिक्रिया यावेळी सत्तार यांनी दिली आहे.
अब्दुल सत्तार काय म्हणाले?
हनुमानासारखी माझी छाती फाडून दाखवली तर त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटीलच दिसतील. विखे पाटील मुख्यमंत्री काय त्यापेक्षा मोठे नेते व्हावेत असे मला वाटते. पण त्यांना अडचण होईल असे मी बोलणार नाही. मला तसे प्रश्नही विचारू नका, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिलीये. ते शिवना येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राधाकृष्ण विखे पाटील आणि रावसाहेब दानवे यांची देखील उपस्थित होती.
राधाकृष्ण विखेंच्या नावाची चर्चा
गेल्या काही दिवसांपासू राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण आलं आहे. चार दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला होता. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीतून सूरू झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र संजय राऊत यांचा हा दावा शिंदे गटाकडून फेटाळण्यात आला आहे. दुरसीकडे नव्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमध्ये विखे पाटील यांचं नाव आघाडीवर आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना देखील मुख्यमंत्रिपद मिळू शकते असंही म्हटलं जातंय.