उना,दि.८: ८५ वर्षीय भाजपा नेत्याला लहान मुलीची छेड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमधील उना जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यावर लहान मुलीची छेड काढल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशमधील उना येथील गगरेट परिसरात ही घटना घ़डली आहे. येथे एका वयोवृद्ध भाजपा नेत्याने लहान मुलीसोबत अश्लील चाळे केले. छेडछाडीचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. आरोपी भाजपा नेता ८५ वर्षांचाय असून, तो आधी सरकारी नोकरीमध्ये होता.
निवृत्तीनंतर तो भाजपामध्ये सक्रिय झाला होता. भाजपाने त्याला उपमंडळ स्तरावरील पदाधिकारी बनवले होते. दरम्यान मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर गगरेट पोलिसांनी हे प्रकरण महिला पोलीस ठाणे, उना कडे वर्ग केले आहे. तिथे भाजपा नेत्याविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग मुलगी भाजपा नेत्याच्या दुकानावर गेली होती. तिथे भाजपा नेत्यांने तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. हे सर्व कुणीतरी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले. व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा पीडित मुलीच्या आईलाही ही बाब समजली. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. आता पोलीस अधिकारी संजीव भाटिया यांनी या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अकट करण्यात आल्याचे सांगितले.