मुंबई,दि.८: शिवसेना (शिंदे गट) नेते, रामदास कदम यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीका केली आहे. माझे राज ठाकरेंशी चांगले संबंध होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संधी मिळेल तेव्हा माझ्यावर अन्याय केला. राज ठाकरेंबरोबर असलेल्या सर्वा शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंनी वाट लावली, असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रामदास कदम म्हणाले, “माझे राज ठाकरेंशी चांगले संबध असल्याने संधी मिळेल तेव्हा उद्धव ठाकरेंनी माझ्यावर अन्याय केला. राज ठाकरेंबरोबर असलेल्या सर्व शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंनी वाट लावली. कुणाचं पद काढलं, कुणाला खाली खेचलं, हेच काम उद्धव ठाकरेंनी केलं. फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहचलो आहे.”
राज ठाकरेंना शिवसेनेचा अध्यक्ष केलं असतं, तर…
“राज ठाकरेंवर अन्याय झाला आहे. राज ठाकरेंना शिवसेनेचा अध्यक्ष केलं असतं, तर मराठी माणसांना न्याय मिळाला असता. बाळासाहेब ठाकरेंची दुसरी छबी म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जातं. उद्धव ठाकरेंच्या आधी राज ठाकरेंनी सुरूवात केली होती,” असं रामदास कदमांनी सांगितलं.
“राज ठाकरे सर्वांना भेटतात. पण, शेतकऱ्यांच्या बांधावर राज ठाकरे जात नाहीत. शेवटच्या माणसापर्यंत ते पोहचत नसून, मुंबई सोडत नाहीत. राज ठाकरेंनी मुंबईच्या बाहेर पडलं पाहिजे. गावा-गावांत गेलं पाहिजे. लोक आणि शेतकऱ्यांच्या सुख-दुख:त गेलं पाहिजे,” असा सल्ला रामदास कदमांनी राज ठाकरेंना दिला आहे.