सोलापूर,दि.8: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर सोलापुरात टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झाला आहे. भाजपमध्ये फडणवीसांवर होत असलेल्या अन्यायाबाबत वेदना झाल्या आहेत. हा फडणवीस यांचा अपमान नाही, तर मागच्या 60 वर्षांपासून काँग्रेसविरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.
‘फडणवीस यांनी काँग्रेस विचाराचा मुख्यमंत्री व्हावा, असा आग्रह केला आहे, त्यांच्या विचारांचं मी मनापासून स्वागत करते. भाजपचे जास्त आमदार निवडून आले, तरी त्यांना काँग्रेसच्या विचारांचा मुख्यमंत्री पाहिजे, याचं मी मनापासून स्वागत करते,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजित पवार यांना सहा महिन्यांसाठी नाही तर 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
छगन भुजबळ बेलवर बाहेर आहेत, असं मी नाही तर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, असा चिमटाही सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांना काढला. सोलापूर शहरातल्या उत्तर सोलापूर मतदारसंघात अल्पसंख्याक मेळाव्यासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी भाजपसह छगन भुजबळांवर पलटवार केला.
नांदेडच्या रुग्णालयात झालेल्या मृत्यूंवरूनही सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. ‘हे सरकार खोके, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. खोक्यांच्या माध्यमातून सगळं चालत आहे. असंवेदनशील सरकार म्हणून शिंदे सरकार आहे, त्यामुळे त्यांनी क्लीन चीट दिली आहे,’ असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.