बीड,दि.15: बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. कराडला आज एसआयटीने बीड येथील कोर्टात हजर केले. त्यावेळी तपास अधिकाऱ्यांनी कराड याच्यावरील गुन्ह्याची यादी कोर्टासमोर दिली. एसआयटीने वाल्मीक कराडविरोधात खळबळजनक दावे केले असून त्याचा देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे.
9 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यात दुपारी 3.20 ते 3.30 वाजता संभाषण झाले होते. त्याचवेळी संतोष देशमुख अपहरण झाले होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा मृतदेह सापडला होता असं अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले.
एसआयटीने न्यायालयात महत्त्वाचे मुद्दे मांडले. संतोष देशमुख यांची कट रचून हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपी सराईत आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याबाबतही तपास करायचा आहे. आरोपी कृष्णा आंधले अजूनही फरार आहे. त्याला लपवण्यासाठी आरोपींनी मदत केली का? हे तपासायचे आहे. आदी न्यायालयात मुद्दे मांडले.
9 डिसेंबरला दुपारी 3 ते 3.15 या काळात संतोष देशमुखचं अपहरण झाले होते. देशमुख अपहरण आणि तिन्ही आरोपींच्या संभाषणाची वेळ मिळतीजुळती आहे. 10 मिनिटे आरोपींसोबत वाल्मिक कराडशी संभाषण झाले
अशी माहिती तपास अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टात दिली. तिन्ही आरोपींमध्ये झालेले संभाषण पाहता पुढील तपासासाठी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडच्या 10 दिवस कोठडीची मागणी केली आहे. घटनेच्या दिवशीच्या संभाषणात नेमकं काय बोलणं झाले हेदेखील अधिकारी येणाऱ्या काळात कोर्टात मांडणार आहेत का हे पाहणे गरजेचे आहे.