मुंबई,दि.५: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी इशारा दिला आहे. अनेक लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, मी कायदा, नियम व संविधानातील तरतुदींनुसारच निर्णय घेणार. अध्यक्षांवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण, अध्यक्ष तुमच्या गिधड धमक्यांनी घाबरत नाहीत. त्यांच्यावर अशा गोष्टींचा प्रभाव पडत नाही, असा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला.
अपात्रतेच्या निर्णयाबाबत निर्णय देण्यास विधानसभा अध्यक्षांकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून (ठाकरे गट) करण्यात येत आहे. यावर बोलताना नार्वेकर म्हणाले, मी अशा आरोपांवर उत्तर देणे आवश्यक समजत नाही. नियम पाळणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे का? कुणाचीही बाजू न ऐकता मी निर्णय दिला, तर हेच लोक उद्या उठून बोलणार. त्यामुळे निर्णय घेण्यात मी दिरंगाईही करणार नाही आणि घाईही करणार नाही, असेही ते म्हणाले.