मुंबई,दि.५: अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. जुलै महिन्यात अजित पवारांसह काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. आता अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगण्यात येत आहे. हा वाद निवडणूक आयोगसमोर आहे. शुक्रवारी, ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगसमोर सुनावणी पार पडणार आहे.
अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. यामुळे अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यावर कुटुंबात काय चर्चा झाली? यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार यांच्या निर्णयानंतर सर्व बंधूंनी फोन करू शरद पवार यांना लढायचं आहे, असं सांगितल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलत होत्या.
गेले ५६ वर्षे शरद पवार एकही निवडणूक हरले नाहीत. यामागचं रहस्य काय? असा प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे यांनी सांगितलं, “त्यांचे गुणसूत्र आणि त्यांच्या आईची इच्छाशक्ती यापाठिमागे आहे. त्यांची आई खूप शक्तीशाली महिला होती. हे फक्त शरद पवार यांना नाहीतर सर्व बंधूंना लागू होतं. मला माहिती नाही, त्यांच्या आईने सर्वांना काय खाऊ घातलं?”
सगळे बंधू एकत्र आहेत का? यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अजित पवारांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर सर्व बंधूंनी शरद पवारांना फोन करून, तुला लढायचं आहे, असं सांगितलं. ८३,८४ आणि ८५ वर्षाचे बंधू एकमेकांना फोन करून लढण्याबाबत बोलतात. ७६ आणि ७५ वर्षांचे बंधू प्रताप पवारही म्हणाले, तुम्हाला लढायचं आहे.”