Vasant More: पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत मनसेचे वसंत मोरेंचं नाव चर्चेत

0

पुणे,दि.६: पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत मनसेचे वसंत मोरेंचं (Vasant More) नाव चर्चेत आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पुण्याच्या लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर कधीही पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या या जागेसाठी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत. यावरून या पक्षांमधील नेत्यांमधेच जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आता या जागेसाठी मनसे देखील मैदान उतरणार असल्याचं दिसत आहे आणि मनसेकडून पुण्यातील आपला हुकमी एक्का फायरब्रॅन्ड नेते म्हणून ओळख असलेले वसंत मोरे यांना उमेदवारी देण्याची मागणी महाराष्ट्र सैनिक करत आहेत.

पुणे लोकसभा पोटनिवडणूक निवडणूक लढविण्याची इच्छा स्वतः वसंत मोरे यांनी जाहीरपणे सांगितली नसली तरी समाज माध्यमांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तशी इच्छा बोलून दाखवली आहे. कार्यकर्त्यांच्या या इच्छेला मोरेंनी प्रतिसाद देत या चर्चांना आणखीच हवा दिली आहे. महेंद्र पाचर्णे पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याने समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये ‘पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत वसंत मोरेंना उमेदवारी मिळाली तर लिहून ठेवा राज्यभरातून मनसे कार्यकर्ते प्रचारासाठी पुण्यात येतील.’ असं म्हंटल आहे. पाचर्णे पाटील यांच्या पोस्टला मोरेंनी प्रतिसाद दिला आहे. ‘क्या बोलती पब्लिक?’ म्हणत निवडणूक लढवायची की नाही या निर्णयाचा चेंडू थेट लोकांच्या कोर्टात टोलवला आहे.

View this post on Instagram

A post shared by Vasant More (@vasantmore88)

वास्तविक पाहता वसंत मोरे हे ज्या प्रभागातून महानगर पालिकेत निवडणून जातात तो विधानसभा मतदारसंघ हा हडपसर आहे. याच मतदारसंघातून वसंत मोरे यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक देखील लढवली आहे. त्यावेळी मोरेंना ३४ हजार ८०९ इतके मतं मिळाली होती. मोरेंच्या या झंजावाताचा फटका भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांना बसला होता त्यांचा २ हजार ८२० मतांनी निसटता पराभव झाला होता. मात्र हडपसर हा मतदारसंघ पुणे लोकसभा कार्यक्षेत्राच्या बाहेर येतो. पुण्यातील आठ मतदारसंघापैकी खडकवासला आणि हडपसर वगळता शहरातील इतर 6 मतदारसंघ हे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे या सहा विधानसभा मतदारसंघात मोरेंची ताकद किती हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे.

वसंत मोरे हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत मनसेतच आहेत. त्यांच्या पक्षावर नाराजीच्या बातम्या अधून-मधून येतच असतात. मोरे पक्ष सोडणार असं देखील बोललं जातं. मात्र वसंत मोरे हे राज ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचं कायमच बोलत आहेत. मोरेंचं वलय हे आता राज्यभर पसरलं असून राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांत वसंत मोरे या नावाची क्रेज असल्याचं पाहायला मिळत. त्यातूनच कार्यकर्त्यांनी मोरेंना लोकसभेची पोटनिवडणूक लढविण्याचा आग्रह केला आहे. मात्र एखाद्या लोकप्रतिनिधींच्या निधनानंतर पक्षाने ती पोटनिवडणूक लढवू नये अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतल्याचं गेल्या काही पोटनिवडणुकीत पाहायला मिळालं आहे. त्यामुळे जर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लागली तर राज ठाकरे आपली भूमिका कायम ठेवतात की कार्यकर्त्यांचा आग्रह मनात आपला हुकमी एक्का असलेल्या वसंत मोरेंना लोकसभेच्या मैदानात उतरवतात याकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here