अपहरण करून दरोडाप्रकरणी एकास जामीन मंजूर

0

सोलापूर,दि.६: अपहरण करून दरोडाप्रकरणी न्यायालयाने एकास जामीन मंजूर केला आहे. यात हकिकत अशी की, मौजे शेटफळ, ता. मोहोळ जवळ दि. १३/१२/२०२१ रोजी रात्री ७.३० च्या सुमारास विजापूरहून अहमदाबाद येथे जाणारी आयशर टेम्पो ५ अज्ञात इसमांनी अडवली व त्या टेम्पोचालकास पोलीस असल्याची बतावणी करुन त्याच्याकडे सदर गाडीची कागदपत्रे मागितली.

तसेच सदर गाडीची चावी एका अज्ञात इसमाने हिसकावून घेवून सदर चालकास मारहाण करुन त्याच्या डोळयांवर पट्टी बांधून त्याचे अपहरण केले. सदर चालकास ५ अज्ञात इसमांनी अहमदनगर शहराजवळ सोडले व सदरचा टेम्पो व त्यातील माल घेवून सदर ५ अज्ञात इसमांनी पोबारा केला. त्याप्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशन येथे दि. १३/१२/२०२१ रोजी गुन्हा दाखल झाला. सदर मोहोळ पोलीसांनी तपासाअंती आरोपी अजित हनुमंत पवार, रा. कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड यास अटक केली.

सदर आरोपीने जामीनासाठी ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयात जामीनाचा अर्ज दाखल केला होता.

सदर जामीन अर्जाच्या युक्तीवादावेळी आरोपीतर्फे असा युक्तीवाद मांडण्यात आला की, आरोपीकडुन कुठलीही गाडी जप्त नाही तसेच सदर गाडीतला माल ही आरोपीकडुन जप्त नाही. सदर गुन्हयातील मुख्य आरोपीने पोलीसांसमोर कबुलीजबाब दिला व त्या कबुलीजबाबामध्ये सदर आरोपीचे नाव समोर आले. सदरचा मुख्य आरोपीचा कबुलीजबाब हा भारतीय पुरावा कायदयानुसार ग्राहय धरला जावू शकत नाही, त्यामुळे अशा तकलादू पुराव्याचा आधार घेवून सदर आरोपीस कारागृहात ठेवता येणार नाही.

सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायाधीश, सोलापूर यांनी सदर संशयित आरोपी अजित हनुमंत पवार याची जामीनावर मुक्तता केली.

यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲप. फैयाज शेख, ॲड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here